११/४/२०१९
सत्र १७ - शशांक लखोटे
पुस्तक - पुतिन
लेखक - गिरीश कुबेर
पुतिन या पुस्तकात लेखक गिरीश कुबेर यांनी रशियाचे अध्यक्ष व्ह्लादिमीर पुतिन या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पुतिन यांची पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी लेखकाने रशियाच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला आहे. राजेशाही/ घराणेशाही आणि त्यातून निर्माण झालेली साम्यवादी राजवट व कालांतराने तिचा झालेला अंत या सर्व घटना पुतिन यांच्या कार्यपद्धतीवर प्रभाव पाडतात.
१९९१ साली झालेल्या विघटनानंतर एकेकाळची महासत्ता असलेली रशिया अवघ्या १० वर्षांच्या काळात आर्थिक व राजकीय दृष्ट्या रसातळाला जाते आणि या पार्श्वभूमीवर पुतिन रशियाची सूत्रे अलगदपणे आपल्या हाती घेतात.
प्रखर आणि आत्यंतिक राष्ट्राभिमान/ राष्ट्रवाद विधिनिषेधशून्य वृत्ती आणि कोणत्याही प्रकारचा विरोध संपवून टाकण्याची प्रवृत्ती उलगडताना लेखक पुतिन यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या / करवून घेतलेल्या विविध दुष्कृत्यांचे दाखले देतात.
सत्ता उभी असावी आडवी नको, या मानसिकतेचे पुतिन एकेक करून सत्तेच्या सर्व चाव्या आपल्या हातात घेतात आणि तहहयात आपणच राष्ट्राध्यक्ष राहू शकतो अशी तजवीज घटनेत करून घेतात. सारासार विचार करता पुतिन यांनी खालील पद्धतींचा वापर करून रशियावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
१. आत्यंतिक राष्ट्रवाद
२. कडवे भाषाप्रेम , संस्कृती प्रेम
३. लष्करावर प्रचंड खर्च, लष्करी कारवायांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे.
४. कोणत्याही मार्गाने विरोध आणि विरोधक संपवणे
५. प्रखर पाश्चात्य विशेषतः अमेरिका विरोध
६. फेर साम्राज्यवाद
वरील सर्वांना एकत्रितपणे पुतीनिझम असे म्हणू शकतो.
पुतिन यांची अशा प्रकारची सत्ता चालवण्याची पद्धत आज अनेक राजकीय नेत्यांना आकर्षित करत आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत त्यांची लोकप्रियता वाढतच जाते आहे. यात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा बळी जातो आहे तो लोकशाही मूल्यांचा !
याच सर्व परिस्थितीचा आढावा लेखक गिरीश कुबेर यांनी समर्थपणे घेतलेला आहे.

No comments:
Post a Comment