Friday, August 25, 2023

सत्र २३७ : India, Bharat and Pakistan - जे साई दीपक : शशांक कुंभारे

२४।०८।२०२३

सत्र २३७वे:

पुस्तक : India, Bharat and Pakistan

लेखक : जे साई दीपक

सादरकर्ते : शशांक कुंभारे



आज शब्दांगण मध्ये सादर होणारं पुस्तक म्हणजे  जे. साई दीपक यांच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं “इंडिया, भारत अँड पाकिस्तान”. भारताच्या इतिहासाचा वेगळ्या संदर्भातून मागोवा घेताना लेखक यामध्ये वसाहतवाद, भारतीय सभ्यतेची पाळंमुळं यांच्या अनुषंगाने  1905 ते 1924 या काळात घडलेल्या घटनांचं विश्लेषण करत जातात. आपल्या तर्कशुद्ध मांडणीसाठी प्रसिद्ध असलेले जे. साई दीपक आपल्या इतिहासावर प्रभाव पडणाऱ्या या आणि आधीच्या काळातील वेगवेगळ्या घडामोडींचा संदर्भ देत एक वेगळी बाजू समोर घेऊन येतात. 

भारताच्या संदर्भातील कुठलीही घटना आपल्यासाठी महत्वाची असते तसंच आपल्या गौरवशाली इतिहासाचा नवीन पैलू समजून घेणंही तितकंच महत्वाचं ! ही मांडणी आपल्यासमोर आज शशांक कुंभारे करणार आहे. ती ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आवर्जून ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Wednesday, August 23, 2023

सत्र २३६ : कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई : तेजस्विनी गांधी

१७।०८।२०२३

सत्र २३६वे:

विषय : कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई 

सादरकर्त्या : तेजस्विनी गांधी



नमस्कार !

डाॕक्टरचा व्यवसाय  पुढली पिढी डाॕक्टर होऊन चालवते. अशी पितृव्यवसायाची परंपरा  सर्वच  क्षेत्रातील कलावंतांना वा कलांना लागू होत नाही. त्यातून साहित्यिकांचे तर खूप वेगळे असते. आणि कवी अथवा चिकित्सक - संशोधक यांचे तर  त्याहून निराळे असते. मराठी साहित्यातील संत साहित्याच्या अभ्यासकांच्या, काव्यमंडळ चालवणाऱ्या कविच्या (रा. चिं. ढेरे) थोर परंपरा लाभलेल्या व्यक्ती, ज्या घरात भिंतीऐवजी पुस्तकेच पुस्तके असतात, अशा घरात जन्मलेल्या व्यक्ती, यांच्या हाताला सहसा साहित्याचे वेगळे बोट असते. 

आपले कविप्रकृतीचे रंग व रस केसरीत कविता छापून आलेल्या शाळकरी वयातल्या अरुणाताईंनी दर्शविले. होय. अरुणा ढेरे.९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, आपल्या वाङ्मयीन प्रेरणा, प्रतिभा, त्यांची बलस्थाने व मर्यादा याबाबत सजगपणे विचारशील असलेल्या, चिंतनशील,  वैचारिक, लेखिका. कथा-काव्य तसेच संशोधनाची परंपरा राखत ६ काव्यसंग्रहांसह

चाळीसेक पुस्तकांची ग्रंथसंपदा नावे असणाऱ्या. आपल्या साहित्यातून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करताना स्त्रीविषयक जाणीवा सतत जिवंत असलेल्या. वैचारिक लिहितानाही, परमेश्वराच्या करुणेचा दीप शब्दांतून येण्याचे मागणे आपल्या करुणाष्टकातून अरुणा ढेरे त्याच्याकडे मागतात.  

अरुणाताईंच्या कवितांवर या गुरुवारी शब्दांगणचे सत्र घेतायत तळेगाव येथे राहणाऱ्या, साहित्याची अभिरूची जोपासणाऱ्या आणि आपल्या तरल कवितांमधून तसेच अभ्यासू वक्तृत्वामधून वेळोवेळी व्यक्त होणाऱ्या तेजस्विनी गांधी ! अरुणाताईंच्या रसाळ काव्याचं तितकंच रसपूर्ण विवेचन नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३५ : विजय तेंडुलकर - नाटक आणि माणूस : मुकुल आव्हाड

१०।०८।२०२३

सत्र २३५वे:

विषय : विजय तेंडुलकर - नाटक आणि माणूस 

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



नमस्कार ! 

तेंडुलकर म्हटल्यावर "सचिन ना?" असेच प्रत्युत्तर येण्याचा एक काळ आपण अनुभवलाय. पण त्याच्या खूप आधी,  मराठी माणसाच्या  भावविश्वात, दुसरे एक प्रत्युत्तर ओठावर व मनावर रुंजी घालत असे- विजय तेंडुलकर! कधी लेखक म्हणून मग कधी  नाटककार म्हणून पुढे पटकथाकार म्हणूनही. सामाजिक भान जपणारे. एका संवेदनशील अभिनेत्रीचे वडिल अशा अनेक परीने ओळख असलेले. 

वेळोवेळी त्यांनी स्वतःची मते मांडली. त्यातून  वादही झाले. तेंडुलकर आणि वाद किंवा तें म्हटले की वाद असेही वाटणारे त्यांचे चाहते अथवा विरोधक होते. आहेत. पण  या सर्वांच्या पलीकडे  एक प्रतिभाशाली व संवेदनशील नाटककार ही त्यांची छबी व त्यांचे महत्त्व  कधीच कोणी नाकारू शकणार नाही. 

नाटककार व माणूस म्हणून ते कसे होते?  किंबहुना,  प्रतिभाशाली नाटककार हा माणूस म्हणून कसा असतो? का तसा असतो? त्या लेखनामागची प्रेरणा काय? हे सारे कोठून येते ? अशा प्रश्नांचा अभ्यास करणारा एक अभ्यासू तरुण मुकुल आव्हाड या विषयी सत्र सादर करतोय.

 यापूर्वीही अनेकदा वेगवेगळ्या सत्रांतून आपला बहुविध विषयांचा अभ्यास शब्दांगणच्या माध्यमातून मांडणारा शब्दांगण परिवाराला परिचित चेहरा मुकुल या गुरुवारचे सत्र सादर करतोय. नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, August 4, 2023

सत्र २३४ : इन द नेम ऑफ ऑनर - मुख्तार माई : निनाद जोशी

०३।०८।२०२३

सत्र २३४वे:

पुस्तक : इन द नेम ऑफ ऑनर 

लेखिका : मुख्तार माई (अनुवाद - उल्का राऊत )

सादरकर्ते : निनाद जोशी



मुख्तारन बीबी जिला आज *मुख्तार माई* म्हणून ओळखलं जातं, तिच्यावर आजचं सत्र होतंय. गॅंग रेप झालेल्या स्त्रीचा न्यायासाठी लढा हा कोणत्याही समाजात आव्हानात्मकच असतो. एखादी फुलन देवी निघते जी व्यवस्थेलाच झुगारून टाकते, पण एखादी मुख्तार माई सुद्धा निघते जी व्यवस्थेच्या चौकटीत न्याय मिळवण्याचा प्रयत्न करते, ते ही सर्वोच्च न्यायालयात जात. पाकिस्तान मध्ये घडलेली ही घटना! आपल्या देशाची बदनामी होऊ नये म्हणून मुशर्रफ सरकार ने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी आणली होती.
या मुख्तार माई ची कथा आजच्या शब्दांगण सत्रात मांडणार आहे *निनाद जोशी* . विवेकानंद सेवा मंडळाचा संवेदनशील कार्यकर्ता, उगवता प्रवचनकार. आजचं सत्र चुकवू नये असं नक्की या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३३ : जेन ऑस्टिन - स्थानिक तरी वैश्विक लेखिका : रेणू गांधी

२७।०७।२०२३

सत्र २३३वे:

विषय : जेन ऑस्टिन - स्थानिक तरी वैश्विक लेखिका

सादरकर्त्या : रेणू गांधी



जेन ऑस्टिन ने अवघी सहा प्रसिद्ध पुस्तके लिहिली. अवघी याच शब्दाला आक्षेप घ्यावा अशी तिची उंची. आपल्या सामान्य अनुभवांकडे बघताना त्यातून तिने मनुष्य स्वभावाचे एवढे अचूक निरीक्षण केले आहे कि तिचे लेखन वैश्विक बनते. म्हणूनच जेन ऑस्टिन केवळ ब्रिटिश किंवा युरोपियनच नव्हे तर भारतीय वाचकांना सुद्धा मोहिनी घालते. तिच्या नायिकांनी *रेणू गांधी* यांच्या सारख्या चोखंदळ आणि मनस्वी व्यक्तिमत्वाला प्रभावित केले नसते तरच नवल. जेन ऑस्टिन आवडायला सुद्धा एक प्रकारचे बंडखोर व्यक्तिमत्व लागते का असा प्रश्न मला पडतो. तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना जेन पुढे मागे पाहत नाही.अनेक अंगांनी आजचे सत्र ऐकायला हवे असे. आज पाऊस खूप आहे. पण आजचे सत्र ऑनलाईनच होतंय. बिलकुल चुकवू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३२ : छंद कवितेचा - मराठी आणि इंग्रजी काव्यातील छंद-वृत्तांची ओळख : रिद्धी करकरे

२०।०७।२०२३

सत्र २३२वे:

विषय : छंद कवितेचा : मराठी आणि इंग्रजी काव्यातील छंद-वृत्तांची ओळख

सादरकर्त्या : रिद्धी करकरे



नमस्कार !
सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकाला
गद्यापेक्षा पद्याचेच बाळकडू मिळते.
अगदी तान्ह्या बाळाला खेळवताना म्हटली जाणारी बोलगाणी, बडबडगीते, झोपताना म्हटली जाणारी अंगाईगीते ही त्याचीच उदाहरणे. अश्या ह्या सगळ्या गाण्यांचे शब्द काहीही असले तरी त्या सर्व गाण्यांना विशिष्ट चालीत म्हणता येते. आणि या सर्वच
 गाण्यांतील सर्वच शब्द अर्थपूर्ण असतातच असेही नाही. काही वेळेला पादपूरणार्थ अशीही त्यांतील शब्दरचना असते.
कारण शब्दापेक्षा त्यातील तालाला वा ठेक्याला खरे महत्त्व असते.
अनेकांचे निरीक्षण तर असे आहे की, अंगाई गीतातील गीतापेक्षा त्यातल्या ताल वा ठेक्यामुळे ते मूल झोपते.
या तालाचा, ठेक्याचा संबंध कवितेच्या चालीशी असतो.
मराठी काव्यामध्ये, ज्याप्रमाणे अश्या तालबध्द, चालबध्द रचनांची मोठी परंपरा आहे तशीच वृत्तबध्द आणि छंदोबध्द रचनेचीही.
हे सारे सांगायचे कारण की, आजचे *शब्दांगण* चे सत्र *मराठी व इंग्रजी काव्यातील छंद आणि वृत्ते*.
अन् ते, सत्र घेणार आहे सूत्रसंचालिका म्हणून स्वतःची ओळख असणारी, मराठी बरोबरच इंग्रजी , संस्कृत अशा विविध भाषांची अभ्यासक व बहुविध वाचन असलेली रिध्दी करकरे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३१ : मर्मभेद - शशी भागवत : मुकुंद करकरे

१३।०७।२०२३

सत्र २३१वे:

पुस्तक : मर्मभेद

लेखक : शशी भागवत

सादरकर्ते : मुकुंद करकरे



नमस्कार
नवरसांमधील एक अतिशय गुंगवून ठेवणारा, विस्मयचकित करणारा रस म्हणजे अद्भुत रस ! या अद्भुत रसावर आधारित कथानकं ही आबालवृद्ध सर्वांनाच प्रिय असतात. मग ते J K Rowling च Harry Potter असू दे किंवा अस्सल भारतीय संस्कृतीत रुजलेली वेताळ पंचविशी ! मध्यंतरीच्या काळात आलेला बाहुबली हा चित्रपटसुद्धा अशाच अद्भुतरम्य कथानकाचे एक उदाहरण ! साधारण शतकभरापूर्वी मराठी कादंबरी विश्वातही अशा नवलकथा येऊन दाखल झाल्या. नाथमाधव लिखित वीरधवल किंवा गो ना दातार लिखित कालिकामूर्ती यासारख्या कादंबऱ्यानी विशाल प्रासाद, राजे- सरदारांची कृष्णकृत्ये, घनदाट अरण्यप्रदेश, गूढ भुयारं, अतृप्त प्रेतात्मे आपल्या भरजरी भाषेतून मूर्तिमंत उभे केले. याच मांदियाळीतील एक दर्जेदार कादंबरी म्हणजे *शशी भागवत लिखित मर्मभेद* ! सूर्य प्रस्थाच्या विशाल साम्राज्यातील कपटी सरदार कृष्णांताचा मर्मभेद कसा होतो ? हे रंगवून सांगणारी ही कादंबरी ! गुप्तहेरांच्या, नव्हे नव्हे ऐयारांच्या मार्फत गुपितं बाहेर काढणारी अशी ही कादंबरी ! विविध भूप्रदेशातून फिरवून पराक्रमांची चित्रं रंगवणारी अशी ही कादंबरी ! आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेच्या खानदानी शब्दलावण्याने नखशिखांत मढवलेली अशी ही एक अप्रतिम कादंबरी आहे.

चोखंदळ वाचक आणि तथ्यप्रचुर व रंजक पद्धतीने विषय मांडणारे *श्री. मुकुंद करकरे* आजच्या सत्रामध्ये मर्मभेदाचे रहस्य सांगतात का हे जाणून घेण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३० : आषाढस्य प्रथम दिवसे : नीरज दांडेकर

०६ ।०७।२०२३

सत्र २३०वे:

विषय :आषाढस्य प्रथम दिवसे

सादरकर्ते : नीरज दांडेकर



नमस्कार !
नुकताच पावसाळा लागलाय. म्हणजे खरोखरच पाऊस नुसता लागून राहिलाय. बरसणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणी जागृत करतो. यात
गतभेटीच्या स्मृती असतात तर कधी
भेटीची आतुरता असते तर कधी विरहाची व्याकुळता.
पाऊस, ढग नि विरह हे तिन्ही एकत्रितपणे वाचल्यावर साहित्यप्रेमींना हटकून स्मरते यक्षाची विरहातील कविता-काव्य म्हणजेच संस्कृत साहित्यातील अजरामर कलाकृतींपैकी कालिदासाचे मेघदूत.
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कवींनी याचे रुपांतर मराठीत करून मराठी वाचकांची खूप मोठी सोय केलेली आहे.
विक्रमादित्य राजाच्या दरबारात राजकवी असलेला कालीमातेचा भक्त कालिदास. हाताच्या बोटाला अनामिका हे नामाभिधान प्राप्त होण्यास कारण कालिदास. अश्या व याहूनही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ऐकायला व संस्कृत काव्याविषयी जाणून घेऊ या आजच्या शब्दांगणच्या सत्रात.
नुकत्याच सुरू झालेल्या आषाढ मासाचे औचित्य साधून आज गुरुवारी शब्दांगणचे सत्र *आषाढस्य प्रथम दिवसे* सादर करतायत आपल्या सर्वांना संस्कृत व मराठी काव्याचे एक व्यासंगी म्हणून परिचित असलेले श्री. नीरज दांडेकर.
तर मग अशा महाकवीचे स्मरण आणखी चिरस्मरणीय करायला सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहून कालिदासप्रेमींमध्ये सामील व्हा.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...