Sunday, September 1, 2024

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

 २५।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६

सत्र २६३वे: 

विषय : निर्णयशास्त्र

सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन

    आपलं आयुष्य घडवण्याचं किंवा बिघडवण्याचं सामर्थ्य आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये असतं असं म्हणतात. अगदी खरेदी करताना नेमकी कुठली वस्तू निवडावी इथपासून ते दहावीनंतर निवडायची शाखा, करियरची निवड, जोडीदाराची पारख आणि अशा आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर, क्षणोक्षणी आपल्याला लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात.आणि हे निर्णय घेत असताना विचारांच्या स्पष्टतेपेक्षा, व . पु. म्हणतात तशी "आपण सारेच अर्जुन" अशी द्वंद्वाची परिस्थितीच अधिक जाणवत असते. 

    खरंतर या निर्णयाबरोबरीने येणाऱ्या जबाबदारीचे, निर्णय चुकला तर काय या अस्वस्थतेचं ओझं कधीकधी इतकं जाणवतं की हे निर्णयाचं स्वातंत्र्य आपल्याला कशाला मिळालं आहे असाही विचार मनाला स्पर्श करून जातो. मग योग्य निर्णय घेण्यासाठी अनेक मार्ग चोखाळले जातात. कोणी कौल लावतं, कोणी ज्योतिष पाहतं, कोणी नाणेफेक करून (toss) निर्णय घेतं तर  कोणी अजून काही .. पण आपला हा निर्णय खरंच आपला असतो का ? असे कोणते घटक आहेत जे या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे ठरतात ? रोजच्या जेवणाला काय बनवायचं या साध्या प्रश्नापासून ते जागतिक राजकारणात धोरण ठरवण्यापर्यंत जळी स्थळी काष्ठी पाषाणी घ्यावे लागणारे निर्णय नेमके कोणत्या प्रक्रियेतून घेतले जातात ? 

    Diary of the decision maker या पुस्तकाचे लेखक श्री. मनिष वैशंपायन हे येत्या सत्रात हाच विषय उलगडून सांगणार आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रात स्वतःच्या कंपनीमार्फत काम करत असतानाच त्यांनी निर्णयशास्त्र या विषयाचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. शब्दांगण मध्ये नेहमीच लेखकाने स्वतः आपलं पुस्तक मांडणे ही पर्वणी असते. येत्या रविवारी सुध्दा निर्णयशास्त्र या विषयावर आयोजित केलेलं हे सत्र ऐकण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २६२ : अहिल्याबाई - लोकोत्तर प्रशासक : डॉ. प्राची दामले

 ११।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर २० श्रावण १९४६

सत्र २६२वे: 

विषय : अहिल्याबाई - लोकोत्तर प्रशासक

सादरकर्त्या : डॉ. प्राची दामले

    स्त्री-मुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचा विविध कार्यक्षेत्रात प्रवेश वा बंदी, त्यांच्या वैयक्तिक समस्या, तसेच त्यांची सुरक्षा हे व याहून अधिक असे अनेकविध विषय नेहमी चर्चेत असतात. सध्या तर काय, स्त्री असणारी पुरुष व्यक्ती की पुरुष असणारी स्त्री असे वेगळ्याच आयामाचे प्रश्नही ऐरणीवर आहेत. ज्या  बांग्लादेशातील अराजकसदृश परिस्थिती हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे त्या देशाच्या निर्मात्या म्हणून ज्यांचे नाव अग्रभागी असते त्याही एक स्त्रीच. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी तेव्हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली.  त्यांच्याविषयी देशात व विदेशातही आदराने व कौतुकाने बोलताना त्यांचे स्री असणेही तेव्हाच्या चर्चेचा मुद्दा झालेला.अर्थात, तेव्हाही  जगात राष्ट्रप्रमुखपदी असणाऱ्या स्त्रियांची संख्या जेमतेमच होती.  या पार्श्वभूमीवर, भारतीय इतिहासात नजर टाकल्यास, ही अशी रणरगिणी व लोकोत्तर स्त्रियांची परंपरा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत दिसते, जी आजही चालूच आहे. मग त्या बाल शिवाजीला प्रशिक्षण देणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब असतील की पेशवेपदासाठी कारस्थान करणाऱ्या आनंदीबाई असतील. अगदी पेशवाईत मध्यभारत व उत्तर भारतातील आपल्या अंमलाखालील प्रदेशात अनेक समाजोपयोगी कामे करून वेळप्रसंगी रणांगणावर तलवार गाजवणाऱ्या अहिल्याबाई होळकर असतील. लढायला जाणाऱ्या सैनिकांमुळे शेतातील पिकांची नासाडी होऊ नये म्हणून पेशव्यांनाच अडवणाऱ्या मल्हाररावांच्या सुनेने वेळप्रसंगी शस्त्रधारी,  हीदेखील आपली ओळख जगाला करून दिली. जमलेला महसूल हा रयतेच्या कामी आणावा, जनहितातून परमार्थ साधावा  हीच त्यांची त्यामागची  भावना. त्यांनी निःस्पृहपणे उभी केलेली विविध समाजोपयोगी कामे आजही साक्षीला आहेत. त्यांच्या समाजोपयोगी कार्याच्या खाणाखुणा आजही दिसतात, काही ठिकाणी सुदृढपणे तर काही ठिकाणी अवशेषरुपात, देवस्थानांमधून,  नदीकाठच्या घाटांमधून.  हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, रविवार ११ ऑगस्ट सायंकाळी ६:३०वा. शब्दांगणच्या सत्राचा विषय आहे अहिल्याबाई होळकर,सादर करतायत डॉ. प्राची दामले. शब्दांगणमध्ये याही आधी त्यांच्या अभ्यासपूर्ण व व्यासंगाने समृद्ध सादरीकरणाचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाय. त्यामुळे नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २६१ : हॉलिवूडचा सुवर्णकाळ : श्री. मनीष टिळक

 २८।०७।२०२४ - राष्ट्रीय सौर ०६ श्रावण १९४६

सत्र २६१वे: 

विषय : हॉलिवूडचा सुवर्णकाळ

सादरकर्ते : श्री. मनीष टिळक

"आम्ही असे इथे उभे आणि सदाशिवराव भाऊ फोडतोय तख्त दिल्लीचं...."

"अरे आम्ही असे दरबारात उभे... आम्ही पाहतोय, महाराज पाहतायत..."

हरितात्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला होता, पानपतचं रणकंदन पाहिलं होतं , बचेंगे तो और भी लडेंगे म्हणणारा जखमी दत्ताजी पाहिला होता.....ते आम्हाला शिवाजी, तानाजी, समर्थ, तुकाराम वगैरे मंडळींना हे असे भेटून आणत असत....आमची अनेक वर्षं अशी समजूत होती की हरितात्या, मोरोपंत, वामन पंडित, तुकाराम, रामदास, शिवाजी महाराज ही सगळी मंडळी लहानपणी एकाच चाळीत राहत होती....  

    हरितात्या हे पुरुषोत्तम आणि त्याच्या सवंगड्यांना वर्तमानात राहूनही इतिहासाच्या सुवर्णकाळात, अर्थात शिवाजी महाराजांच्या युगात फेरफटका मारून आणत असत. अगदी त्याचप्रमाणे शब्दांगणच्या यावेळच्या सत्रात हॉलिवूडचा तपशीलवार इतिहास आपल्यासमोर जिवंत करणारं एक खास व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडवर त्यांचं निव्वळ उदंड प्रेमच आहे असं नव्हे तर त्या विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास देखील आहे. हॉलिवूडच्या सुवर्णकाळातले उत्तम चित्रपट, त्यातले नायक-नायिका, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, अप्रतिम संवाद, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या सगळ्या गोष्टी त्यांच्या सनावळ्यांसकट त्यांच्या ओठावर आहेत. कुठला प्रसंग कसा घडला, तो कसा चित्रित केला गेला, त्यामागची दिग्दर्शकाची भूमिका काय होती, नायकाची प्रतिक्रिया काय होती इत्यादी तांत्रिक बारकाव्यांसकट हॉलिवूडच्या चमचमत्या विश्वाचे तपशील त्यांच्या ओठांवर लीलया खेळत असतात.

    शब्दांगणच्या यावेळच्या सत्राचा विषय आहे 'हॉलिवूडचा सुवर्णकाळ' आणि सत्र सादर करणार आहेत आपले सर्वांचे लाडके आणि शब्दांगण परिवाराचे घरचे सदस्य श्री मनीष (प्रसाद) टिळक. मनीष टिळक यांनी शब्दांगणमध्ये यापूर्वीही आपल्या खुमासदार आणि तितक्याच विद्वत्तापूर्ण शैलीने अनेक बहारदार सत्रे सादर केली आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. यावेळी ते हॉलिवूडसारखा लोकप्रिय विषय त्यांच्या अनोख्या शैलीत श्रोत्यांसमोर मांडणार आहेत.

     सत्राच्या अखेरीस Kirk Douglous, Marlon Brando, Henry Fonda, Gregory Peck, Paul Newman, Steve McQueen, James Stewart, Richard Burton, Robert Mitchum, Humphrey Bogart, Audrey Hepburn, Susan Hayward, Liz Taylor, Ingrid Bergman, Jane Fonda आणि मनीष टिळक हे बालपणी हॉलिवूडच्या एखाद्या आलिशान मॅन्शनमध्ये एकत्र लहानाचे मोठे झाले होते अशी प्रेक्षकांची समजूतच नव्हे तर खात्री होईल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे हा सुवर्णकाळ चुकवायचा नसल्यास आपण सर्वांनी सत्राला आवर्जून उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २६० : लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप : श्री. विवेक भगत

१४।०७।२०२४ - राष्ट्रीय सौर २३ आषाढ १९४६

सत्र २६०वे: 

विषय : लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप

सादरकर्ते : श्री. विवेक भगत

    भारत देशाचे वर्णन करताना हमखास वापरले जाणारे एक वाक्य म्हणजे विविधतेत एकता! ही विविधता आपल्याला भारतीयांच्या देवतांमध्ये आणि मंदिरांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. तेहतीस कोटी देवांच्या गणनेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतीलही पण गल्लोगल्ली, पारापारांवर, घरोघरी आणि सर्व भारतभरच असंख्य मंदिरे भाविकांच्या भक्तीचे केंद्र ठरतात. खरं पाहता देवासमोर उभं राहिलं की डोळे आपसूक मिटतात आणि मन आतमध्ये डोकावून पाहू लागतं पण मनाची ही शांतता अनुभवण्याबरोबरच जर डोळसपणे देवतेच्या मूर्तीकडे किंवा मंदिराच्या रचनेकडे पाहिलं तर तीसुद्धा मूकपणे आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते. कधी मंदिरांच्या खांबांवर, भिंतींवर कोरलेल्या पौराणिक कथा, रुपकं आपलं मन आकर्षून घेतात तर कधी तिथलं स्थापत्य आपल्याला अचंबित करतं.कोणार्कचे सूर्यमंदिर, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर किंवा आपल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर अशी कित्येक मंदिरे स्थापत्यशैलीच्या दृष्टीने वैशिष्टयपूर्ण ठरतात. भारतामध्ये तर स्थापत्यकलेच्या विविध शैली मंदिरांच्या अनुषंगाने विकसित झाल्या आहेत. प्रत्येक प्रदेशाच्या मंदिरांची एक विशेष ओळख बनत गेली. एकूणच काय तर भारतातील मंदिरे ही जशी सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रबोधनाची केंद्र होती, आहेत, तशीच ती शिल्पकलेच्या, स्थापत्याच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वाची ठरली आहेत. पण या मंदिरांच्या रचनेकडे नेमकं पाहायचं कसं? मंदिराकडे डोळसपणे बघायचं कसं ? असे  अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. गेली अनेक वर्ष यासंबंधी मार्गदर्शन करणारे श्री. विवेक भगत येत्या शब्दांगण सत्रात यासंबंधीच एक विषय मांडणार आहेत. लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप याविषयावर ते आपल्याशी बोलणार आहेत. आजवर इतिहास तसेच भारतीय शिल्पकला, स्थापत्य इ. विषयांवर विवेकजींनी केलेले लेखन आपण विविध माध्यमांतून वाचले असेल. येत्या रविवारी प्रत्यक्ष त्यांच्याकडून या विषयावरील मार्गदर्शन मिळवण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५९ : या सम हा (आचार्य अत्रे) : सौ. वृंदा कुलकर्णी

२३।०६।२०२४ - राष्ट्रीय सौर ०२ आषाढ १९४६

सत्र २५९वे: 

विषय : या सम हा (आचार्य अत्रे)

सादरकर्त्या : सौ. वृंदा कुलकर्णी

    शब्दांगणच्या या दुसऱ्या पर्वामध्ये साहित्यिकांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणारी सत्रे व्हावीत अशी कल्पना आयोजकांनी केली होती. आणि खरोखरच या संकल्पनेच्या अनुषंगाने एकाहून एक सरस अशी सत्रे शब्दांगणमध्ये सादर झाली. अगदी गेल्याच सत्रामध्ये शौनक ने पु. लं च्या समग्र प्रतिभेचे जणू मूर्त दर्शन घडवले. येत्या रविवारचे सत्र सुद्धा अशाच एका चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ठरणार आहे. या रविवारी आचार्य अत्रे यांच्या साहित्याचा आणि जीवनाचा प्रवास उलगडून दाखवणारे सत्र "या सम हा" सादर होणार आहे. 

    जसे पुलंच्या विनोदबुद्धीने अवघ्या महाराष्ट्राचं रंजन केलं तसंच अत्र्यांच्या विनोदाने सुद्धा महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि इतकंच नव्हे तर सामाजिक व्यंगांवर ताशेरे सुद्धा ओढले. आचार्य अत्रे म्हटलं की सिद्धहस्त साहित्यिक, निर्भीड पत्रकार, प्रतिभावंत चित्रपट निर्माते, प्रभावी वक्ते,  सच्चे राजकारणी,   समाजकारणी अशी अनेक रूपं डोळ्यासमोर येतात. यातील अनेक रूपे तर आजही आदर्श ठरवीत अशीच ! 

    पण या सर्व रूपांमध्ये सरस ठरावं असं रूप म्हणजे त्यांचं शिक्षक हे रूप ! आधी पुण्यातील कॅम्प भागातील शाळेत प्रत्यक्ष शिक्षक म्हणून नोकरी करणं असू दे किंवा पुढे पत्रकारिता किंवा राजकारण करत असताना समाजाला आदर्शांची शिकवण देणे असू दे, अत्रे खऱ्या अर्थाने "आचार्य" होते. शब्दांगणचे भाग्य असे की पेशाने शिक्षिका असणाऱ्या सौ. वृंदा कुलकर्णी येत्या सत्रात अत्र्यांच्या अनेक ज्ञात- अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. अत्रे म्हटलं की कऱ्हेचे पाणी किंवा झेंडूची फुलं इ. काही ठरावीक गोष्टी पटकन आठवतात पण त्यापलीकडे जाऊन त्यांच्या समग्र साहित्याचा आढावा वृंदाताई घेणार आहेत.  याआधीही शब्दांगणमध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील कारुण्यसिंधू हे सत्र त्यांनी घेतले होते. मराठी भाषेवर उत्तम पकड, व्यासंग आणि मुद्देसूद मांडणी ही त्यांच्या वक्तृत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला आठवत असतीलच. येत्या रविवारी सुद्धा आचार्य अत्रे यांचा साहित्यप्रवास समजून घेण्यासाठी नक्की या संध्याकाळी सहा वाजता !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५८ : प्रतिभापुरुषोत्तम : श्री. शौनक पिंपुटकर

 ०९।०६।२०२४ - राष्ट्रीय सौर १९ ज्येष्ठ १९४६

सत्र २५८वे: 

विषय : प्रतिभापुरुषोत्तम

सादरकर्ते : श्री. शौनक पिंपुटकर

    ग्रीक पुराण कथांमध्ये मिडास राजाची गोष्ट सांगितली जाते. तो ज्या गोष्टीला हात लावेल त्याचे सोने होईल असा वर या राजाला मिळालेला असतो. मला वाटतं, खऱ्या आयुष्यातही अशा सुवर्णस्पर्शी प्रतिभेचं वरदान काही व्यक्तिमत्त्वांना लाभलेलं असावं किंबहुना आपल्या परिश्रमांनी आणि साधनेने त्यांनी ते प्राप्त करून घेतलं असावं, म्हणूनच अशा व्यक्तींनी स्पर्श केलेल्या सर्वच क्षेत्रांचे जणू सोने होते ! अष्टपैलू हा शब्दही उणा ठरावा, अशी बावनकशी प्रतिभा लाभलेलं असंच एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे ! पु. लं बद्दल लिहिताना कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणूनच म्हणतात, 

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली 

नवा सूर आनंदयात्रा मिळाली 

निराशेतुनी माणसे मुक्त झाली 

जगू लागली, हास्य गंगेत न्हाली 

    पुलंस्पर्शाची ही संजीवनी आजही कायम आहे. या महिन्यात १२ जून रोजी पुलंचा स्मृतिदिन !या निमित्ताने पुलं स्मरणाच्या आनंद यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ९ जून, रविवार रोजी पुढचं सत्र प्रतिभापुरुषोत्तम अर्थात पु. लंच्या बहु आयामी प्रतिभेचे दर्शन घडवणारे असणार आहे. खरंतर त्यांनी केलेलं विनोदी लेखन असो वा वैचारिक लेखन, संगीत दिग्दर्शन असो वा नाट्यनिर्मिती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकाच वेळी विद्वत्ता, रसिकता आणि कल्पकतेचा संगम झाला होता. बरं हे गुणही 'चंद्रमे जे अलांछनु' असेच ! कारण त्यांच्या विद्वत्तेला बोजडपणाचा शाप नव्हता, विनोदी लेखनातूनही सहज प्रकट होणारी, अवडंबर न माजवणारी अशी त्यांची शालीन विद्वत्ता ! रसिकताही कशी, तर खाण्यापासून ते गाण्यापर्यंत आणि सामान्य माणसापासून ते असामान्य व्यक्तींपर्यंत साऱ्यांमधलेच गुणावगुण अचूक हेरणारी ! आणि कल्पकताही नवोन्मेषशालिनी असूनही सत्याच्या पायावरच भराऱ्या घेणारी ! खरंतर हे सारे पैलू म्हणजे एकेका स्वतंत्र सत्राचे विषयच परंतु एकाच सत्रात यातील अनेक पैलूंना स्पर्श करून पुलंच्या समग्र साहित्याचं चित्र मांडायचं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. पण हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे शब्दांगण कुटुंबातील एक पुलप्रेमी सदस्य  शौनक पिंपुटकर !

    शौनकने याआधीही मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, एक शून्य मी अशा पु. लंच्या पुस्तकांवर आणि इतरही विषयांवर सत्रे घेतली आहेत. आणि आता महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांच्या समग्र साहित्याविषयी आणि जीवनाविषयी तो काय दृष्टिकोन मांडतो याची उत्सुकता आहे. 

    पु. ल आपल्या खाद्यजीवन या लेखामध्ये म्हणतात, चिवड्याची चव ही खाणाऱ्यांच्या संख्येने गुणल्यावर वाढते. या सत्राची रंगत सुद्धा उपस्थित श्रोत्यांच्या संख्येने गुणल्यावर वाढेल. तेव्हा ९ जून ची संध्याकाळ पुलकित करण्यासाठी भेटूया संध्याकाळी  ५.३० वाजता !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५७ : सावरकर विचारधारा : श्री. दुर्गेश परुळकर

२६ ।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर ०५ ज्येष्ठ १९४६

सत्र २५७वे: 

विषय : सावरकर विचारधारा

सादरकर्ते : श्री. दुर्गेश परुळकर



    समुद्राची खोली आणि पर्वताची उंची फुटपट्टीत मोजली जात नाही त्यासाठीचे निकष वेगळे असावे लागतात. ते फॅदम आणि मीटर्स / किलोमीटर मध्ये मोजले जातात. आपण बऱ्याचदा महापुरुषांचे माहात्म्य मोजताना त्यांना आपल्या फुटपट्टीमध्ये मोजण्याची चूक करतो. बरे आपल्या सोयीनुसार त्यांच्याबाबत तथ्येही आपण निवडत जातो. गांधींचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने विचारधारा आणि सावरकरांबद्दल विचार करताना प्रामुख्याने ऐतिहासिक घटना अशा तुलनेकरता घेतल्या जातात. त्यांची तुलना करताना स्वाभाविक वस्तुनिष्ठता दिसत नाही. हे लिहिण्याचं कारण म्हणजे शब्दांगणचं आजचं सत्र.  सावरकरांची विचारधारा हा विषय गेले अनेक महिने मनात होता. पण तो मांडण्यासाठी त्याच तोलामोलाची व्यक्तीही हवी होती. सध्या विशेषतः राजकीय वर्तुळात सावरकरांचे नाव चर्चेत. पण ज्यांना शिवाजी महाराज कळले नाहीत त्यांना सावरकर कळणं सुद्धा कठीण. गांधी गोंधळ हा जोडीला पुढे आहेच. या पार्श्वभूमीवर इतिहासतज्ज्ञ दुर्गेश परुळकर सावरकर विचारधारा मांडत आहेत. दुर्गेश परुळकर यांच्यासारखा वक्ता आज आपल्याला लाभलाय, हे आपले भाग्यच. नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५६ : खर्‍या मौनाची भाषांतरे : श्रीमती सायली टिळक

१२।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर २२ वैशाख १९४६

सत्र २५६वे: 

विषय : खर्‍या मौनाची भाषांतरे

सादरकर्त्या : श्रीमती सायली टिळक



    आटपाट नगर होतं, त्या नगरात एक छोटं पण सुखी कुटुंब राहत होतं. बाबा,आई आणि मुलगा असं हे त्रिकोणी कुटुंब!  सर्व काही छान चालू होतं, मात्र या सर्व सुखाला एकच कारुण्याची किनार होती. आई-बाबांना अजिबात ऐकू येत नसे. कर्णबधिर हा शब्द कळायच्यासुद्धा आधी मुलाला आपल्या आईवडिलांबरोबर जुळवून घ्यावं लागे. दोघे आईवडील जन्मतःच कर्णबधिर असल्यामुळे त्याचा बोलण्यावर पण आपसूकच परिणाम झाला होता. मुलगा मात्र शारिरीक दृष्ट्या संपूर्ण निरोगी होता. लहानपणापासून आपल्याला काय हवंय हे आई-वडिलांपर्यंत पोचवायचं कसं हाच त्याला प्रश्न पडायचा. पण आईवडील हुशार आणि समंजस होते, त्या दोघांचं सहजीवन हे कदाचित एखाद्या शारिरीक दृष्ट्या सुदृढ जोडप्याला लाजवेल असं‌ होतं.  नात्यांमधला संवाद दोघांनी छान जपला होता. हेच संस्कार मुलावर झाले तर नवल नाही, मुलाला देखील आपल्या आईवडिलांच्या व्यंगाचा न्यूनगंड वाटत‌ नसे. घरीच काय, पण बाहेर फिरताना देखील तो त्यांना‌ छान सांभाळून घेत सगळीकडे अभिमानाने हे माझे आई-बाबा अशी ओळख करून देत असे. शाळेतल्या मित्रांना देखील तो आणि त्याचे आई-बाबा घरी बोलावून त्यांचा प्रेमाने पाहुणचार करायचे. आपल्या व्यंगत्वाने आयुष्यातील रंग उडून न‌ जाता त्यात उत्साहाचे, प्रेमाचे आणि संवादाचे रंग भरणारं हे कुटुंब खरोखर विलक्षण! 

    अशी अनेक कुटुंबं किंवा‌ व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात, काही शारिरीक व्यंगामुळे एका कोपर्‍यात गेलेली, पण जगण्याची उमेद कायम जिवंत ठेवणारी! व्यक्ती म्हणून आपण  सहसा त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहतो, पण त्यांना सहानुभूती नाही, आपुलकी हवी असते. त्यांच्या जगाबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते आणि या दोन जगामधील सीमारेषा पुसण्याचा देखील सहसा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. पण हे काम करणारे काही सहृदयी लोक‌ असतात, त्यांपैकी एक म्हणजे आपल्या शब्दांगण परिवाराच्या सदस्या सायली टिळक! आणि या शब्दांगणच्या २५६व्या सत्रात त्या आपल्याशी याच अनुभवांवर बोलणार आहेत, खर्‍या मौनाची भाषांतरे या विषयावर ! सायली टिळकांचं सत्र म्हणजे अनोखे अनुभव आणि लालित्यपूर्ण संवाद हे समीकरण त्यांच्या विजया मेहतांवरच्या सत्रामधून आपल्या परिचयाचं झालं आहेच. या सत्रात त्या दिव्यांगांच्या क्षेत्रातील काम करतानाच्या स्वानुभवांवर बोलणार आहेत, त्यामुळे एक रंजक आणि आपुलकीचं विश्व आपल्यासमोर उलगडेल यात शंका नाही.आपल्या संस्कृतीतील भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । हा मंत्र खरोखर जगणार्‍या कर्णबधिर दिव्यांगांच्या विश्वात डोकावण्याची ही संधी अजिबात चुकवू नका.

नक्की या !!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५५ : काश्मीर : श्री. चन्द्रशेखर टिळक

०१।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर ११ वैशाख १९४६

सत्र २५५वे: 

विषय : काश्मीर

सादरकर्ते : श्री. चन्द्रशेखर टिळक



आपल्या भारत देशाचा नकाशा पाहिला तर त्यात भारतमातेच्या मुकुटाप्रमाणे शोभणारे राज्य म्हणजे काश्मीर! अवर्णनीय अशा निसर्ग सौंदर्याबरोबरच या काश्मीर राज्याने एके काळी अनुपम बुद्धीसौंदर्यही अनुभवले आहे. प्राचीन काश्मीरचा इतिहास लिहिताना कवी कल्हणाने राज तरंगिणी या ग्रंथात म्हटले आहे, विद्यावेश्मनि तुङ्गानि कुङ्कुमं सहितं पयः । द्राक्षेति यत्र सामान्यम् अस्ति त्रिदिवदुर्लभम् ।। अर्थात् स्वर्गातही दुर्मिळ अशी विद्याभवने, कुंकुम, हिमजल, द्राक्षादि पेये जिथे अगदी सहज मिळतात असा प्रदेश म्हणजे काश्मीर ! पण दुर्दैवाने एकेकाळच्या या भारताच्या नंदनवनाला आज मात्र दहशतवाद आणि इतर अनेक समस्यांनी घेरले आहे.अशा परिस्थितीत कलम ३७०, काश्मीर फाईल्स, काश्मीरी दहशतवाद इ. मुद्दे प्रसार माध्यमांमध्ये मीठ- मसाला लावून चर्चेत असताना संवेदनशीलपणे या मुद्द्यांवर आणि एकंदरच काश्मिरच्या संस्कृतीवर भाष्य करणारे एक पुस्तक म्हणजे श्री. चन्द्रशेखर टिळक लिखित, मोरया प्रकाशनाचे ' काश्मीर ' हे पुस्तक होय. या पुस्तकावर बोलण्यासाठी स्वतः टिळक सर शब्दांगण मध्ये येत आहेत. तसंच यावेळी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन ॲड. सौ. वृंदा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते होणार आहे. श्री. चन्द्रशेखर टिळक यांचे सत्र, मग ते अर्थ विषयावर असो वा अगदी गजानन विजय सारख्या विषयावरील ललित मांडणीचे असो.. शब्दांगणच्या श्रोत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. येत्या सत्रात श्री. चन्द्रशेखर टिळक स्वतः आपल्या पुस्तकावर अर्थात काश्मीर बद्दल बोलणार आहेत.  मागे २०० व्या सत्रात त्यांनी बदलता भारत या विषयावर बोलताना काश्मीर खोऱ्यातील अनुभवांवर केलेलं भाष्य आपल्यापैकी अनेकांना आठवत असेलच. अशाच अनुभवांवर बोलण्यासाठी, काश्मीर विषयक भावनिक- सांस्कृतिक - सामाजिक अंगाने केलेला अभ्यास मांडण्यासाठी टिळक सर पुढचं सत्र घेणार आहेत. स्वतः लेखकाने आपल्या पुस्तकावर सत्र घेणं हा शब्दांगणसाठी नेहमीच दुग्धशर्करा योग असतो. या सत्रातही शुष्क पुस्तकी अभ्यासापलीकडे जाणारं टिळक सरांचं संवेदनशील चिंतन ऐकण्यासाठी नक्की या.

या सत्राचा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे वक्त्यांच्या विनंतीवरून या सत्राचे ध्वनिमुद्रण आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व !


सत्र २५४ : नारायण सुर्वे - कविता आणि माणूस : श्री. मुकुल आव्हाड

 १४।०४।२०२४ - राष्ट्रीय सौर २५ चैत्र १९४६

सत्र २५४वे: 

विषय : नारायण सुर्वे - कविता आणि माणूस

सादरकर्ते : श्री. मुकुल आव्हाड



    मंडळी आजचं शब्दांगण अतिशय खास.  गेल्या काही वर्षात जाणकार वाचक बनलेला मुकुल आजचं सत्र घेतोय आणि तेही नारायण सुर्वेंवर! शब्दांगण २.०  मध्ये एखादा लेखक / कवी / कलावंत त्याच्या कलाकृती आणि माणूसपण या दोन्हीसह मांडण्याचा विचार आहे... त्या दृष्टिकोनातून आजचं सत्र! नारायण सुर्वे म्हटलं कि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली या ओळी सहजच आठवतात. प्रत्येक कलावंत हा आपल्याच समाजाशी बांधलेला असतो... तो त्या समाजाचा द्रष्टा साक्षीदार असतो, आणि समूहाच्या प्राक्तनाचा भागीदार सुद्धा. दलित साहित्य आपल्या समाज जीवनातली नग्नता प्रकर्षाने मांडतं. त्या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वे समोर येतात.... आक्रस्ताळी नव्हे पण आग्रही. बोटचेपे तडजोडवादी नव्हे पण संयमी. नारायण सुर्वेंच्या व्यक्तित्वाची मांडणी ही म्हणूनच वास्तववादी समाजाच्या मांडणीशिवाय पूर्ण होत नाही. Man is not known by what happens to him but by how he responds to it.... मुकुल आव्हाड घेणार असलेलं 'नारायण सुर्वे: कविता आणि माणूस' हे शब्दांगणचं सत्र ऐकायला आज नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २५३ : मला उमगलेले भैरप्पा : श्री. गणेश मनोहर कुलकर्णी

२३।०३।२०२४ - राष्ट्रीय सौर ३ चैत्र १९४६

सत्र २५३वे: 

विषय : मला उमगलेले भैरप्पा

सादरकर्ते : श्री. गणेश मनोहर कुलकर्णी

     काही साहित्यकृतींमध्ये भाषेची कुंपणं ओलांडून अवघ्या मानवी मनाला भुरळ घालण्याची, जागं करण्याची आणि विचार प्रवृत्त करण्याची क्षमता असते, अशाच काही साहित्यकृतींचे जनक म्हणजे कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ! वैदिक तत्त्वज्ञानावर पोसलेल्या या भारतभूमीमध्ये ऋषींना फार आदराचं स्थान आहे. बाह्य रुपापेक्षा आंतरिक सत्याचा शोध जास्त महत्त्वाचा मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत ऋषीचे वर्णनही म्हणूनच केवळ त्याने वाढविलेल्या दाढीवर अवलंबून नाही. ऋषय: सत्य वचस: अर्थात् सत्याचे दर्शन घेणारे आणि घडवणारे ते ऋषी असे आपली संस्कृती म्हणते. एस. एल भैरप्पा हे म्हणूनच आधुनिक भारतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ! असत्याचे आवरण दूर करून सत्याचे सार्थ दर्शन घडवणारे असे साहित्यिक म्हणजे एस एल भैरप्पा ! सध्या समाजमाध्यमांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वत्रच  सत्याच्या नावाखाली तथ्याचे एकांगी दर्शन घडत असतं अशा वेळी भैरप्पा कादंबरी या म्हटलं तर काल्पनिक लेखन माध्यमासाठी सुद्धा वर्षानुवर्ष अभ्यास करतात, भारतातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देतात आणि त्यानंतरच्या चिंतनातून त्यांना गवसलेलं सत्य अतिशय निर्भीडपणे मांडतात हे खरोखर वैशिष्टयपूर्ण आहे ! ते धर्मश्री , वंशवृक्ष यासारख्या कादंबऱ्यांमधून कधी तत्त्वज्ञानाचा विचार मांडतात, उत्तरकांड सारख्या कादंबरीत उत्तर रामायणाचे तर पर्व मधून महाभारताचे एक वेगळेच दर्शन घडवतात तर कधी मंद्र सारख्या कादंबरीमध्ये एकाच व्यक्तिमत्त्वामधील, दिवसेंदिवस उन्नतीचे सोपान चढणारा कलाकार आणि त्याबरोबरीने अवनतीच्या गर्तेत पडणारा माणूस असा विरोध दाखवून विषण्ण करतात. खरंतर भैरप्पांच्या कथांमध्ये तत्त्वज्ञान, इतिहास, काव्य, संगीत असे वेगवेगळे कप्पे उरतच नाहीत त्यांची अलवार पण भक्कम अशी वीणच ते विणत जातात. अशीच ही अनेक रंगांनी, अनेक धाग्यांनी गुंफलेली वीण उलगडून सांगणारं शब्दांगणचे पुढचे सत्र... मला उमगलेले भैरप्पा ! विविधांगी वाचन आणि विपुल लेखन करणारे, रुळानुबंध या पुस्तकाचे लेखक श्री. गणेश कुलकर्णी हे सत्र घेणार आहेत. एस. एल भैरप्पा यांचे लेखन मराठी माणसापर्यंत पोचवण्याचं श्रेय जातं त्या अनुवादिका अर्थात् उमा कुलकर्णी!  गणेशजींनी उमा ताईंच्या घेतलेल्या मुलाखतीचे आपल्यापैकी अनेक डोंबिवलीकर साक्षी असाल. येत्या सत्रात ते आपल्याला भैरप्पांच्या साहित्य विश्वाची सफर घडवणार आहेत. तेव्हा दिनांक २३ मार्च २०२४ रोजी भैरप्पांच्या साहित्य विश्वात डोकवून बघण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २५२ : माझा टाटा विश्वातील प्रवास : श्री. माधव जोशी

१०।०३।२०२४ - राष्ट्रीय सौर २० फाल्गुन १९४५

सत्र २५२वे: (डोंबिवलीकर कल्चर क्लबच्या सहयोगाने)

विषय : माझा टाटा विश्वातील प्रवास

सादरकर्ते : श्री. माधव जोशी



    भारतीय उद्योगजगतातील एक अग्रगण्य आणि आदरणीय उद्योग समूह म्हणजे टाटा उद्योग समूह ! कै. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये स्थापन केलेल्या या उद्योगाने अव्याहत प्रगतीचे सोपान चढत अवघं भारतीय उद्योग विश्व व्यापून टाकलं आहे; इतकंच काय जगभरात भारतीय उद्योगाची मान उंचावण्यामध्ये टाटा समूहाचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.

    पण टाटा समूहाचं यश केवळ संपत्ती किंवा शेअर बाजारातील स्थाना पुरते मर्यादित नाही तर त्यापलीकडे जाऊन या कंपनीने समाजाभिमुखता जपत लोकांच्या मनामध्ये विश्वासाचे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. आणि म्हणूनच टाटा समूहाच्या या उत्कर्षाचे सूत्र नेमके काय आहे, केवळ बाजारमूल्याला किंमत असलेल्या कॉर्पोरेट जगात टाटा समूहाने वर्षानुवर्षे नीतीमूल्यांची जोपासना कशी केली असेल याबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात असते.

    पिढ्यानपिढ्यांचा हा विश्वास कमावणाऱ्या या टाटा नामक मॉडेलच्या यशाचे गमक नेमके काय हे उलगडून सांगणारं, एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे डोंबिवलीकर श्री. माधव जोशी लिखित टाटा : एक विश्वास ! खरंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा अनेक वर्षांचा दांडगा आणि विविधांगी अनुभव असलेल्या माधवजींना आपण डोंबिवलीकर ओळखतोच. २०२२ मध्ये प्रकाशित झालेलं माझी कॉर्पोरेट दिंडी हे त्यांचं आत्मचरित्रसुद्धा आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. टाटा समूहामध्ये २२ वर्षांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळताना माधवजींनी खुद्द रतन टाटांबरोबरही जवळून काम केले आहे. शब्दांगणच्या येत्या २५२ व्या सत्रात श्री. माधव जोशी स्वतः आपल्या पुस्तकाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. तसंच या सत्रामध्ये टाटा एक विश्वास या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन ही होणार आहे.

    तेव्हा येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता टाटा: एक विश्वास या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी नक्की भेटूया !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २५१ : समर्थ रामदास - ऐतिहासिकता आणि राष्ट्रीयता : श्री. कौस्तुभ कस्तुरे

२५।०२।२०२४ - राष्ट्रीय सौर ६ फाल्गुन १९४५

सत्र २५१वे: 

विषय : समर्थ रामदास - ऐतिहासिकता आणि राष्ट्रीयता

सादरकर्ते : श्री. कौस्तुभ कस्तुरे



    शब्दांगण २.० चे पहिले अर्थात २५१वे पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत इतिहास अभ्यासक श्री. कौस्तुभ कस्तुरे ! महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल असणारी कौस्तुभजींची तळमळ आणि त्यांच्या वक्तृत्वातून आणि अनौपचारिक गप्पांमधूनही दिसणारा त्यांचा दांडगा अभ्यास याचा अनुभव यापूर्वीही आपल्यापैकी काहींनी घेतलेला आहेच. येत्या रविवारी ते समर्थ रामदास: ऐतिहासिकता आणि राष्ट्रीयता या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा शब्दांगणच्या नवीन पर्वाच्या या शुभारंभाच्या सत्रात अर्थात दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी, रविवारी, संध्याकाळी सहा वाजता नक्की भेटूया !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


शब्दांगण सत्रांची यादी (द्वितीय पर्व)

 शब्दांगण सत्रे 

नमस्कार !

शब्दांगणच्या द्वितीय पर्वातील सत्रांची तपशीलवार यादी खाली दिली आहे. आपण हव्या त्या सत्रावर जाऊन त्या सत्राचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद !

    - शब्दांगण परिवार


सत्र २५१ : समर्थ रामदास - ऐतिहासिकता आणि राष्ट्रीयता : श्री. कौस्तुभ कस्तुरे

सत्र २५२ : माझा टाटा विश्वातील प्रवास : श्री. माधव जोशी

सत्र २५३ : मला उमगलेले भेैरप्पा : श्री. गणेश मनोहर कुलकर्णी

सत्र २५४ : नारायण सुर्वे - कविता आणि माणूस : श्री. मुकुल आव्हाड

सत्र २५५ : काश्मीर : श्री. चन्द्रशेखर टिळक

सत्र २५६ : खर्‍या मौनाची भाषांतरे : श्रीमती सायली टिळक

सत्र २५७ : सावरकर विचारधारा : श्री. दुर्गेश परुळकर

सत्र २५८ : प्रतिभापुरुषोत्तम : श्री. शौनक पिंपुटकर

सत्र २५९ : या सम हा (आचार्य अत्रे) : सौ. वृंदा कुलकर्णी

सत्र २६० : लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप : श्री. विवेक भगत

सत्र २६१ : हॉलिवूडचा सुवर्णकाळ : श्री. मनीष टिळक

सत्र २६२ : अहिल्याबाई - लोकोत्तर प्रशासक : डॉ. प्राची दामले

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...