शब्दांगण : द्वितीय पर्व
आयोजकांचे मनोगत
नमस्कार मंडळी !
सध्याच्या OTT platforms च्या युगात कोणत्याही webseries चा एक सीझन येऊन गेला की दुसऱ्या सीझन बद्दल चर्चा सुरू होतात. काही web series मध्ये तर शेवटचा एपिसोड अशा काही रोमांचक वळणावर आणि उत्कंठावर्धक क्षणापाशी ( cliff hanger) थांबतो की दुसरा सीझन कधी येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते. सनसनाटी दृश्ये, थरारक प्रसंगांची मांडणी, अगदी ज्वलंत विषय आणि तितकेच ज्वालाग्राही संवाद असं सगळं रसायन असलेल्या या web series बद्दल अशी उत्सुकता निर्माण होणं साहजिकच.. पण यातलं काहीही नसून सुद्धा, शून्य बजेट वर चालणाऱ्या पण दर गुरुवारी काही नवं समजावं, थोडी अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, आपल्यासारखेच समानशील वाचक भेटावेत एवढ्या मर्यादित उद्देशाने सुरू झालेला शब्दांगणचा पहिला सीझन तब्बल २५० एपिसोड्स अर्थात २५० विविधांगी सत्र देऊन गेला. आणि अडीचशेव्या सत्रानंतर, आता पुढे काय ? हा पूर्णविराम की स्वल्पविराम हे स्पष्ट न करताच पहिल्या सीझन ची सांगता झाली. पण प्रथम पर्वानंतर घेतलेला विराम हा पूर्णविराम न ठरता अल्पविराम ठरावा आणि पुन्हा नव्या दमाने शब्दांगण सुरू व्हावे ही व्यक्त झालेली अपेक्षा आम्हा आयोजकांना निश्चितच बळ देऊन गेली. आणि म्हणूनच कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की शब्दांगण २.० पुन्हा एकदा नवीन रुपात, नवीन सत्रांसह तुमच्या भेटीला येत आहे.
ज्ञानवर्धक आणि विचार प्रवर्तक सत्रांची शृंखला कायम ठेवतानाच नवीन रूपातील शब्दांगण हे पुस्तक परिचयाच्या पलीकडे जाऊन विविध विषयांचा धांडोळा घेईल. इतिहास, पर्यावरण, राजकारण अशा विषयांबरोबरच एखाद्या साहित्यिकाच्या समग्र साहित्याचा आढावा घेणारी अभ्यासपूर्ण सत्रे नवीन रूपात सादर होतील. आणि अर्थातच हा संवाद एकतर्फी न राहता नेहमीप्रमाणेच विषयाला अनुसरून अनौपचारिक चर्चा, गप्पा आणि त्यातून उलगडत जाणारे ज्ञानाचे पदर हे सगळं चित्र नवीन रूपातही अगदी तसंच राहील.
पण मंडळी हे सगळं वाचून तुम्ही लगेच दिनदर्शिकेतील पुढचा गुरूवार शोधायला लागला असाल तर मात्र थांबा ! प्रथम सत्रानंतर नोंदवलेल्या आपल्या अपेक्षा विचारात घेऊन नवीन रूपातील शब्दांगण हे महिन्यातून दोन रविवारी संध्याकाळी आयोजित करण्यात येईल असे ठरवले आहे. आणि म्हणूनच आता अधिक मोठ्या संख्येने श्रोते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील अशी आम्हा आयोजकांची प्रामाणिक इच्छा वजा अपेक्षा आहे.
शब्दांगणच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच या पर्वाला देखील आपण सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची खात्री आहे. शब्दांगणच्या द्वितीय पर्वातील सत्रांचा आनंद सुद्धा या ब्लॉगवर आपल्याला घेता येईल. या सत्रांची यादी असणारा दुवा खाली जोडत आहोत, त्यावर जाऊन नक्की या नवीन सत्रांचा आनंद घ्या !
- शब्दांगण परिवार
शब्दांगण द्वितीय पर्वातील सत्रांच्या यादीचा दुवा : -
https://shabdangandkws.blogspot.com/2024/09/blog-post.html