Saturday, January 13, 2024

शब्दांगणबद्दल थोडेसे...

                                                                     


शब्दांगण


 शब्दांगण हा ‘ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीचा’ एक सांस्कृतिक उपक्रम आहे. ही आहे एक साहित्य चळवळ, तुमच्या आमच्यासारख्या वाचनप्रेमींसाठी एक व्यासपीठ.

📚 वाचन संस्कृती📚 जोपासण्याचा एक प्रयत्न!सर्वांनी उत्तम साहित्य वाचावे, जे आपल्याला आवडले ते इतरांना सांगावे, इतरांनी वाचलेले आपण ऐकावे, शब्दांगणात बागडावे, आनंदसागरात बुडुन जावे अशी यामागची कल्पना.😇 रसिक वाचक आपल्याला भावलेल्या मराठी , इंग्रजी पुस्तकांचा परिचय इतरांना करून देतात. विषयाला काही बंधन नाही. यात अगदी रहस्यकथा ते गीतारहस्य अशा अनेक प्रकारांवर  सत्रे झाली.हा जरी प्रामुख्याने एक पुस्तक परिचयाचा कार्यक्रम असला तरी इथे केवळ पुस्तकांवरच चर्चा होते असे नाही तर अनेक विषयांवर सत्रे होतात, चर्चा होतात. थेट आर्य चाणक्यापासून ते आजच्या गुलजारपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर सत्रे झाली. ईशान्य भारत, भारताच्या सीमा व युद्धस्मारकांवरही सत्र झाले. बालदिनाला आपले शाळकरी वाचकही इथे बोलले. इथे कविता सादर झाल्या व कवितेचे व्याकरणही सादर झाले. शब्दांगणात हॅरी पॉटर व बोक्या सातबंडे एकत्र बागडले. इथे वाचक बोलले ,लेखक बोलले,अनुवादक  व प्रकाशकही व्यक्त झाले.कोरोनामुळे मार्च 2020 पासून कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध आले. शब्दांगणसाठी एकत्र जमण्यावर बंदी आली. पण शब्दांगण थांबले नाही. वाईटातून चांगले शोधून शब्दांगण 💻zoom meeting , fb live📱 व YouTube live📲 वर चालू झाले. स्थलकालाच्यामर्यादा संपल्या. आता अगदी आपल्या अंगणात बसूनही तुम्ही शब्दांगणात संचार करू शकता.
शब्दांगणात यायला वय, शिक्षण,व्यवसाय कसले कसलेच बंधन नाही. कसलेच शुल्क नाही. हवी फक्त वाचनाची भूक, साहित्याची ओढ. कोणीही रसिकाने यावं, इथल्या साहित्यसरितेत  बुडावं व दोन ओंजळी आपल्याही अर्पाव्यात!! 

शब्दांगणच्या सर्व सत्रांबद्दल माहिती देणारा आणि Youtube दुवे उपलब्ध करून देणारा हा ब्लॉग  रसिकवाचकांना नक्की आवडेल अशी आशा आहे.! 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...