Wednesday, December 8, 2021

सत्र २७ - शौनक पिंपुटकर - वंगचित्रे- पु. ल. देशपांडे

२७/६/२०१९ 

सत्र २७ - शौनक पिंपुटकर 

पुस्तक- वंगचित्रे 

लेखक- पु. ल. देशपांडे 

भाषा ही पुस्तकातून शिकता येत नाही. पुस्तकात असतात ते भाषा नामक दुनियेच्या नकाशातील ठळक शहरे दाखवणारे ठिपके आणि नद्या-पर्वतांसाठी काढलेल्या काळ्या निळ्या ओळी. ते शब्द, त्यांचे उच्चार, त्यांचे साहचर्य, त्यांची रसरूपगंध निर्माण करण्याची शक्ती ही जिथे ती भाषा बोलली जाते त्या ठिकाणी जाऊनच ऐकणे आवश्यक असते. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले आहे. भाषा देखील अशीच अनुभवावी...

-वंगचित्रे

मराठी भाषेची आत्ताच्या काळातली सुद्धा दोन दैवतं. कुसुमाग्रज आणि पुलं. लौकिकार्थाने, दुर्दैवाने आज दोघेही हयात नाहीत. पण साहित्याच्या रूपाने त्यांचा वारसा समृद्ध आहे आणि होतोय. आजकाल व्हिडिओ आणि ऑडिओ सुविधेमुळे पुलं ऐकलेले जास्ती आणि वाचलेले कमी असतात. त्यामुळे म्हैस, अंतू बर्वा, पानवाला अशा साहित्यातून समोर येणारे पुलं आपल्याला जास्त परिचित.  आपल्या मार्मिक कोट्यांनी, विनोदाने नाटकांनी रसिकांना त्यांनी मोहिनी घातली आहेच. पण पुलंच्या वैचारिक साहित्याचं वाचन त्यामानाने कमीच झालेलं दिसतं. अपूर्वाई, पूर्वरंग च्या माध्यमातून विनोदी अंगाने का होईना त्यांची प्रवास वर्णने वाचली जातात पण बऱ्याचदा रवींद्रनाथ तीन व्याख्याने, मुक्काम शांतिनिकेतन, वंगचित्रे अशा पुस्तकातून आपल्यासमोर येणारे पुलं तर अनेकांना ज्ञात सुद्धा नसतात. या पार्श्वभूमीवर 'वंगचित्रे' या पुस्तकाचा परिचय करू देतोय शौनक पिंपुटकर. रवींद्रनाथांच्या साहित्याचं, शांतिनिकेतनचं आणि बंगाली भाषेचं त्यातून बंगाल प्रांताच्या दर्शनाचं पुलंनी खास त्यांच्या शैलीत केलेलं वर्णन म्हणजे 'वंगचित्रे'. भाषिक अस्मितांच्या जमान्यात आणि वादांच्या पार्श्वभूमीवर एका भाषेतील दैवताने दुसऱ्या भाषेतील दैवताचं आणि त्यातून संबंध भाषेवरील प्रेमाचं केलेलं एक प्रकारे जागरणच आहे हे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे याहून वेगळं काय असतं? हे पुस्तक नक्की वाचावं असंच !

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...