०८।०९।२०२२
सत्र १८७ वे:
विषय : अरुण शौरी यांची चार पुस्तके
सादरकर्ते : हेरंब ओक
The Show must go on !, रंगभूमीशी निगडित असणार्या प्रत्येक व्यक्तीला हे वाक्य जवळजवळ वेदमंत्राएवढंच पवित्र आहे. मात्र दैनंदिन आयुष्यातदेखील अनेकदा हा मंत्र आचरणात आणावा लागतो. शब्दांगणचं १८७वं सत्र पूर्वनियोजनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणावर होणार होतं. मात्र ऐनवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे व विस्कळीत झालेल्या लोकलसेवेमुळे नियोजित वक्ते सत्रासाठी उपस्थित होऊ शकले नाहीत. मात्र सत्र रद्द करावं लागू नये यासाठी आपल्या शब्दांगण परिवाराचे सदस्य हेरंब ओक यांनी अरुण शौरींच्या चार पुस्तकांवर अत्यंत अप्रतिम सत्र घेतलं. विशेष उल्लेखाची बाब म्हणजे आपण वाचलेल्या पुस्तकांच्या नोट्स काढून ठेवण्याच्या सवयीमुळे अतिशय कमी पूर्वतयारीवर देखील एक परिपूर्ण सत्र त्यांनी सादर केले. हा गुण प्रत्येक उत्साही वाचकाने अंगी बाणवावा असा आहे यात शंका नाही. अरुण शौरी हे अनेक वाचकांना उत्तम स्तंभलेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या आत्मवंचना, गव्हर्नन्स, ख्यातनाम इतिहासकार आणि फतव्यांचे जग या पुस्तकांवर हे सत्र सादर झालं. अरुण शौरी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनशैलीमुळे सुपरिचित आहेतच; ही चार पुस्तकेही त्याला अपवाद नाहीत. या चार पुस्तकांमध्ये भारत-चीन संबंध, प्रशासकीय सेवेतील समन्वयाचा अभाव, तथाकथित इतिहासकारांमुळे झालेली इतिहासाची मोडतोड आणि इस्लामी धर्मातील फतवे या अत्यंत वेगळ्या आणि चाकोरीबाहेरच्या विषयांवर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे या वेगळ्या पुस्तकांवरचं तितकंच वेगळं पण रंजक सत्र नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !





