Thursday, November 9, 2023

सत्र २४५ : बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास (संपा.- अंबरीष मिश्र) : सायली टिळक

०२।११।२०२३

सत्र २४५वे:

पुस्तक : बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास

संपादक : अंबरीष मिश्र

सादरकर्त्या : सायली टिळक



आधुनिक  मराठी रंगभूमीच्या विशेषतः गद्य रंगभूमीच्या वाटचालीत वेगवेगळ्या काळात वेगवेगळी अनेक वळणे येत राहिली. यातलाच एक महत्त्वाचा  टप्पा म्हणजे प्रायोगिक रंगभूमी.  साधारणपणे  समांतर चित्रपट -आर्ट फिल्म- चळवळीच्या काही काळ आगेमागे ह्या रंगभूमीचा एक महत्त्वाचा अध्याय रचला गेला. यातील महत्त्वाचे योगदान देणाऱ्या  संस्था वा व्यक्ती अथवा संस्थात्मक व्यक्ती म्हणजे बाई. नवीन पिढीला आदर्शवत असलेल्या अनेक अभिनयनिपुण दिग्गजांची एक फळी घडवणाऱ्या विजया मेहता.आजचे अभिनयाचे मापदंड असे  अनेक अभिनेता-त्री बाईंबाबत किती किती सांगू तुला याप्रकारे सांगू लागतात..त्यात अतिशयोक्ती टाळून हातचे न राखता वस्तुनिष्ठपणे सांगूनही काहीतरी उरतेच. रंगभूमीच्या सर्व अंगांचा कसून अभ्यास व जवळजवळ सर्वच पैलूंवर समान प्रभुत्व. कोणत्याही अभिनिवेशाविना सादरीकरणात नवनवीन आयाम व पायंडे पाडले. तेही  मूळ भारतीय परंपरेची कास न सोडता. वा  उगाच मेलोड्रामॕटिक न होता. कोणत्याही विषयावरील संहितेला यथायोग्य न्याय देण्याची सहजसिध्द क्षमता असणाऱ्या बाईंनी रंगायन संस्थेतून केलेले अनेक प्रयोग अचंबित करतात. नाटकाप्रमाणेच चित्रपटांवरही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. बाईंनी घडवलेल्यांपैकी  अनेक प्रथितयश नाट्यकर्मींनी लिहिलेले, बाईंना दिग्दर्शन केलेल्या पुलंसारख्याने, श्री पुं सारख्या  सहकाऱ्याने लिहिलेले असे पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख संपादित करून पुस्तक तयार केलंय तितक्याच सिध्दहस्त अंबरिश मिश्रांनी. अशा ह्या पुस्तकावर यावेळचे शब्दांगणचे दिवाळीपूर्व सत्र सादर करतायत,शैक्षणिक मानसशास्त्र तज्ज्ञ, अनुभवी व्यावसायिक समुपदेशक अश्या बहुआयामी तसेच यंदाच्या साहित्ययात्री २०२३ स्पर्धेच्या उपविजेत्या ठरलेल्या संघाच्या सायली टिळक.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४४ : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख) : मुकुल आव्हाड

२६।१०।२०२३

सत्र २४४वे:

विषय : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख )

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



हिंदू-मुस्लिम संबंध, इस्लाम, सावरकर, भारताची फाळणी, गांधीहत्या, १८५७ चा जिहाद/स्वातंत्र्यसमर अशा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयांवर बुद्धिवादी, प्रगल्भ आणि तितकंच वादळी लेखन करणारं व्यासंगी, तत्त्वज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे डॉ शेषराव मोरे. महाविद्यालयात प्राध्यापकी करत असताना अभ्यास आणि वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने चाळीशीतच निवृत्ती स्वीकारून रोज १७-१८ तास वाचन सुरू झालं आणि त्या वाचन, चिंतनातून अक्षरशः एकेका रत्नासमान ग्रंथ जन्माला आले."सावरकर व कुरुंदकर यांच्याकडून आम्ही बुद्धीवाद शिकलो... शब्दप्रामाण्य नव्हे!" हे शेषरावांचं वाक्य त्यांच्यातल्या बुद्धीवाद्याचं निदर्शक आहे.एवढं विविधांगी लेखन करताना संदर्भ आणि पुराव्यांची छाननी करून सत्य आणि वस्तुस्थिती ठामपणे मांडणं हे शेषरावांचं ब्रीद होतं. अर्थात हे करत असताना अनेक लोकांना अप्रिय वाटेल असं किंवा ते दुखावले जातील असं लेखन होणं हे स्वाभाविकच होतं. शेषरावांनी अनेक नियतकालिकं, मासिकांमध्ये लिहिलेल्या अशाच काही अप्रिय वाटणाऱ्या परंतु परखड मतं मांडणाऱ्या लेखांचे संग्रह म्हणजे 'अप्रिय पण' आणि 'विचारकलह' आणि हाच विषय आहे आपल्या येत्या गुरुवारच्या शब्दांगणच्या सत्राचा. शेषरावांच्या विचारांवर सत्र घेणं हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा कमी नाही हे ज्यांनी शेषराव वाचलेत ते नक्कीच मान्य करतील. हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याच शब्दांगण मधील अतिशय अभ्यासू आणि उत्तम वाचक असलेला मुकुल आव्हाड. ज्यांनी शेषराव वाचले आहेत त्यांनी पुनर्नुभूती चा प्रत्यय घेण्यासाठी, ज्यांनी वाचले नाहीयेत त्यांनी का वाचायला हवेत हे समजून घेण्यासाठी आणि ज्यांना वाचायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर वाचायला सुरुवात करावी यासाठी या सत्राला उपस्थित राहणं अनिवार्य आहे!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४३ : टाटा स्टोरीज् - हरीश भट : मंगेश देशपांडे

 १९।१०।२०२३

सत्र २४३वे:

पुस्तक : टाटा स्टोरीज्

लेखक : हरीश भट

सादरकर्ते : मंगेश देशपांडे



नमस्कार ! राष्ट्रउभारणीत राजकीय व्यवस्थेच्या बरोबरीने वस्तुतः उद्योगपतींचाही अजोड सहभाग असतो. भारतीयांसाठी अशा एका उद्योग वा उद्योगसंस्थेचे नाव घ्यायचे झाल्यास, अपार आदराने  नि विश्वासाने प्रत्येक भारतीयाच्या ओठी येईल ते नाव म्हणजे टाटा. बदलत्या  काळाबरोबर  मूल्यव्यवस्थेतले बरेच काही ढासळले तरी हा विश्वास तसूभरही न हटता, वाढला. टाटा समूहाच्या विविध गुणांची चर्चा नेहमीच होत असते. नि त्याविषयी ह्याआधी आलेल्या पुस्तकांतून वा अन्यत्र आपल्यापैकी अनेकांनी  वाचलेले असेलही. उदा. कार्यशैली, कार्यपरंपरा (Legacy), सामाजिक बांधिलकी.  टाटांविषयी कधी काही उणे-अधिक ऐकले, तर चटकन कोणालाही विश्वसनीय वाटले नाही. छोट्या-छोट्या कथा-दंतकथा अन् त्याही विश्वसनीयरीत्या पसरणे, पसरविल्या जाणे, हेही त्यांच्या यशाचे एक गमकच.मग कधी भारतरत्न जे. आर. डीं.नी कोणा पादचाऱ्याला दिलेली लिफ्ट वा पंडित नेहरूंना दिलेला सल्ला असेल. किंवा शत्रुराष्ट्र म्हणून रतन टाटांनी व्यावसायिक प्रस्तावच मांडायला दिलेला नकार असेल. किंवा २६/११ च्या ताज हल्ल्यानंतर  टाटांनी दाखवलेली माणुसकी व सहृदयता व त्यातून  केवळ एका व्यक्तिचाच नव्हे, तर  संपूर्ण टाटा समूहाचा दृग्गोचर झालेला उदारमनस्क दृष्टिकोन.म्हणूनच मग, जे. आर. डीं.ना भारतरत्न दिल्याबद्दल व रतन टाटांना  भारतरत्न देण्याची मागणी करताना समस्त भारतीयांच्या मनात एकाच आत्मीयतेने आनंदाचे भाव उमटतात. अश्या ह्या टाटा समूहाविषयी, १५च्या आसपास पुस्तके प्रकाशित होऊनही नवनव्या लेखकांना जसे लिहावेसे वाटते तसेच टाटामध्ये ३० हून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या हरीश भटांसारख्या प्रथितयश लेखकालादेखील. CEO सारख्या विविध उच्च पदांसह, टाटाच्या शिखर संस्थेतील उच्च पदस्थांपैकी एक असलेल्या हरीश भट यांच्याकडील अनेकानेक कथा-कहाण्यांचा साठा सांगण्याचा मोह त्यांना न झाला  तरच नवल. त्यांच्या लेखनाविषयी यापूर्वीच्या पुस्तकांतून ते अनेक वाचकांना सुपरिचित झालेतच. आजच्या शब्दांगणच्या सत्रात हरीश भट लिखित टाटा स्टोरीज् विषयी सांगणार आहेत शब्दांगण परिवाराचे हितचिंतक सदस्य, या आधीही आगळ्यावेगळ्या धाटणीच्या पुस्तकांवर व लेखकांवर सत्रे घेतलेले चोखंदळ वाचक मंगेश देशपांडे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४२ : सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा : क्षितिज देसाई

१२।१०।२०२३

सत्र २४२वे:

विषय : सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा

सादरकर्ते : क्षितिज देसाई



जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर किंवा प्रसंगी फिलिप के डिक, आयझॅक असिमोव यांसारख्या महान वैज्ञानिक/विज्ञान कथाकारांनी आपलं बालपणीचं वाचनविश्व समृद्ध केलेलं असतं. त्या विज्ञानकथा वाचत असताना आपणही असं काहीतरी लिहावं असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात निदान एकदा तरी नक्की डोकावून गेलेला असतो. विज्ञानकथांच्या विश्वात हरवून गेलेलो असताना आपल्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे आपल्या सर्वांना आठवत असतीलच. काही व्यक्तींनी मात्र स्वतःला मनातल्या मनात कल्पना रचण्यापुरतंच मर्यादित न ठेवता, त्या फुटलेल्या धुमाऱ्यांवर प्रत्यक्ष काम केलं. असाच एक युवा, सशक्त विज्ञानकथाकार, आपला डोंबिवलीकर असलेला क्षितिज देसाई या वेळच्या शब्दांगणच्या सत्रामधून आपल्या भेटीला येतोय. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा त्याचा विज्ञानकथा संग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. हा कथासंग्रह, एकूणच विज्ञानकथा, त्या कशा सुचतात, कशा लिहाव्यात, त्याचा स्वतःचा लेखनप्रवास आणि लेखनानुभव अशा विविध गोष्टींवर क्षितिज श्रोत्यांशी गप्पा मारणार आहे. आपण सर्वांनीच आणि विशेषतः विज्ञानकथाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावं असं हे सत्र ! नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २४१ : जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली : मनीष टिळक

 ०५।१०।२०२३

सत्र २४१वे:

पुस्तक : जंगलाचं देणं

लेखक : मारुती चितमपल्ली

सादरकर्ते : मनीष टिळक



नमस्कार! सध्या सर्वत्र बदलत्या हवामानाविषयी खूप मोठ्या प्रमाणावर बोलले जातंय. आपण त्याचे चटके आणि धक्के अनुभवतोय. वाढते तापमान, घटते पर्जन्यमान, बदलते ऋतुमान हे सगळे निसर्गात मानव निर्मित किंवा मानवप्रायोजित हस्तक्षेपांमुळे होतंय असंही ऐकू येतंय. यात मोठ्या प्रमाणात बदल होतायत ते वृक्षराजींमध्ये. जंगलांच्या आकारांमध्ये, क्षेत्रफळांमध्ये. जंगले ही तोडल्यानंतर आणि साफ झाल्यानंतर बोलण्याची व आरडा ओरडा करण्याची बाब नसून ती आस्तित्वात असताना हिरवीगार वनराजी म्हणून आपले वैभव मिरवत असताना त्यांचा आनंद लुटायला हवा. निसर्ग आपल्या दोन्ही हातांनी यथेच्छ आणि भरभरून दान देत असताना आपणच तिथे न पोचता जर मेट्रो आणि कॉंक्रीटच्या जंगलात रमत राहिलो तर आपल्यासारखे करंटे आपणच. जंगल प्रेमी, भटके, पक्षीनिरीक्षक, वन्यजीव रक्षक, वनरक्षक हे तिथे जातातच आणि जात राहतीलच. पण आपल्यासरख्या सामान्य माणसाला त्या जंगलात जायला उद्युक्त करायला कोणी तरी एखादी कळ फिरवावी लागते. अश्या एक नव्हे अनेक कळी फिरवणारे, जंगलांवर प्रेम करणारे आणि त्यावर लेखन करून त्या लेखनाचा पुरेपुर आनंद वाचकांना देणारे लेखक आज आपल्याला मराठीत वाचायला मिळतात. ह्या सर्वांमध्ये ज्यांचे मानाचे स्थान आणि पान आहे असे एक लेखक म्हणजे  मारुती चितमपल्ली!  जंगल आपल्याला काय नव्हे, काय काय देते, किती किती देते, कसे कसे देते ह्या सर्वांचा यथोचित धांडोळा घेणारे, जंगलांचा  शास्त्रशुद्ध  अभ्यास व संवर्धन करणारे वनरक्षक  *श्री.मारुती चितमपल्ली! *ह्यांच्या जंगलाचे देणे ह्या पुस्तकाविषयी आपल्याला यथायोग्य, सांगोपांग विवेचन करणारे आजचे वक्तेही तितकेच तोलामोलाचे आहेत. शब्दांगण परिवाराला  परिचित असणारे, मनीष टिळक !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४० : सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेच्या वारसा - तत्त्वमसि - ध्रुव भट्ट : हेरंब ओक

१४।०९।२०२३

सत्र २४०वे:

विषय : सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेचा वारसा - तत्त्वमसि

पुस्तक : तत्त्वमसि

लेखक : ध्रुव भट्ट

सादरकर्ते : हेरंब ओक



शब्दांगण समूहामध्ये दर वर्षी वाचनशतक पूर्ण करणारं अर्थात शंभर अभ्यासपूर्ण पुस्तके वाचणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे हेरंब दादा ! आज ऑनलाईन माध्यमातून तत्त्वमसि या पुस्तकावर ते बोलणार आहेत. नर्मदा परिक्रमा हा आपल्यापैकी अनेकांसाठी जिव्हाळ्याचा, कुतूहलाचा आणि भक्तीचा विषय असतो. नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगणारी अनेक पुस्तकं ही आपण वाचतो. पण परिक्रमे पलीकडचे नर्मदे काठचे जग, समाजजीवन, संस्कृती या सगळ्याचा उहापोह करणारी कादंबरी म्हणजे तत्त्वमसि ! मूळ भारतीय वंशाच्या पण अमेरिकास्थित तरुणाला नर्मदा मैय्या कशी दिसते, तिथलं आदिवासी जीवन, चालीरीती संस्कृती या सगळ्याचं दर्शन नेमकं कसं घडतं याचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात केलेलं आहे. ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या आणि अंजली नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी आजच्या सत्राला नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २३९ : साहित्ययात्री अनुभव कथन : स्पर्धक आणि आयोजक

०७।०९।२०२३

सत्र २३९वे:

विषय : साहित्ययात्री अनुभव कथन

सादरकर्ते : स्पर्धक आणि आयोजक



मंडळी.. आपल्या साहित्ययात्री या स्पर्धेची दखल माध्यमांनी घेतली. ही स्पर्धा  आयोजक आणि स्पर्धक दोघांसाठीही भरभरून देणारी होती. याचा पुनर्प्रत्यय म्हणून आपलं शब्दांगणचं उद्याचं सत्र खास साहित्ययात्रीसाठी समर्पित! आणि त्याचं तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण... उद्याच्या सत्रात आयोजक आणि स्पर्धक दोघांचेही अनुभव कथन होईल त्यासोबतच अनुभवलेले किस्से, आलेली आव्हानं, अभिप्राय, आयोजकांसाठी सूचना यावरही चर्चा होईल. साहित्याशी निगडित स्पर्धा आयोजित करताना घडणारे किस्से आणि येणारी आव्हानं जाणून घेण्यासाठी आणि साहित्ययात्रीच्या स्वरुपाची ओळख करुन घेण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...