Monday, May 29, 2023

सत्र २२४ : भूशास्त्रातील गमतीजमती : निनाद भागवत

२५।०५।२०२३

सत्र २२४वे:

विषय : भूशास्त्रातील गमतीजमती

सादरकर्ते : निनाद भागवत



उन्हाळ्याच्या काहिलीत शेकल्यावर पावसाच्या ४ थेंबांचेही अप्रूप वाटते. मग हा जो कोसळतो तो जीव नकोसा करतो. कधी अति ऊन, तर कधी अति धंडी! हे सगळे त्या अल् निनोमुळे! असे कुठेतरी वाचनात येते. खरे तर हे बदलते उष्णतामान, पर्जन्यमान पृथ्वीशी संलग्न आहेत. म्हणजेच पृथ्वीचे / भूपृष्ठाचे तापमान. या
भूपृष्ठाचा अभ्यास, म्हणजेच भूशास्त्र ! या शास्त्राशी आपला संबंध फक्त मातीचे प्रकार, कुठे कुठली माती असते? कुठल्या पिकाला कोणती माती ? कुठल्या मातीत कुठली खनिजे मिळू शकतात? इतकाच आलेला असतो. किंवा फार फार तर
एखाद्या प्राचीन संस्कृतीविषयी संशोधन करण्याकरता कुठे उत्खनन करावे लागेल ? कुठून व कसा लाव्हा फुटतो? यासारख्या काही बाबी जेव्हा आपल्या समोर फुटतात. तेव्हा शाळेत कधीतरी आलेला असतो. अन्यथा, प्रत्यक्ष जीवनात, केदारनाथचे भूस्खलन, हिमालयात गिर्यारोहकांची हिमस्खलनामुळे होणारी कोंडी, माळीण गावाचे गाडले जाणे किंवा भूकंप अशा बातम्या वाचून त्याविषयी आपण सजग होतो. तेव्हा मग आपल्याला पुन्हा ते सगळे विस्मृतीत गेलेले मुद्दे म्हणजे, जमिनीचा प्रकार, बर्फाच्या थराची जाडी, Deccan plateau वगैरे शब्द आठवतात.
हे घडाभर प्रास्तविक करण्याचे कारण,
शाळेतून एकदा व एकदाचा या विषयाला टाटा-बाय-बाय म्हटल्यानंतर पुन्हा या विषयाच्या वाटेला कोणी एक जण जातो. नव्हे त्यावर संशोधन करतो. इतकेच नाही तर त्यावर शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करणाऱ्या मंडळीत आपली शोधपत्रिका मांडतो. तो विषय घेऊन आपल्या पुढील आयुष्याचा मार्ग आखतो. त्याला आपले करियर मानतो. हे खूपच आगळे आहे. ह्या अशा विषयाचे विविध पैलू अत्यंत गंभीरपणे अभ्यासणारा निनाद भागवत आपल्या डोंबिवलीचाच असावा. हाही एक दुर्मिळ योगच!
खरे म्हणजे, मातीच्या अभ्यासात केवळ काळी, मुरुम, लाल इतकेच प्रकार नाहीत. तर चंद्र, मंगळ याही ग्रहांवरच्या मातीचे पृथःकरण करावे लागते. हे भूशास्त्र म्हणजे भूपृष्ठाचा अभ्यास, पृथ्वीचे वय, तिचे अंतरंग, तिचे तापमान, त्यामुळे बदलणारे ऋतुमान, पर्जन्यमान, भूजल, नद्यांची पातळी, यापासून ते डोंगर, टेकड्या, मातीचे प्रकार, अगदी पार ग्रहगोलांवरील भूरचनांच्या अभ्यासापर्यंत याची व्याप्ती आहे. अशा सकळ पृथ्वीला आंदोळून ते पार खगोलापर्यंत पोचणारी ही शास्त्रशाखा. या बहुपेडी शास्त्राच्या कवेत काय काय म्हणून येते हे कळायलाही आपल्याला थोडा वेळ लागेल. सहजगत्या आवाक्यात न येणाऱ्या ह्या एकदम वेगळ्या अवघड वाटेवरती अध्ययन करून, संशोधन करून *'अभ्यासोनि प्रकटावे'* तसा हा तरुण डोंबिवलीकर संशोधक म्हणजे निनाद भागवत ह्या विषयाची माहिती आपल्यापुढे मनोरंजक पध्दतीने
सादर करणार आहे. तेही दृक्-श्राव्य सादरीकरणाच्या स्वरुपात.

भारतात अभियांत्रिकी शिक्षण त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण -->नोकरी ह्या सध्याच्या ठरीव चाकोरीपेक्षा हटके अभ्यास-विषय निवडणारा अमेरिकेत Ph.D. करत असलेला हा pathbreaker म्हणावा असा तरुण लेखक !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २२३ : तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण : आशुतोष टिळक

१८।०५।२०२३

सत्र २२३वे:

विषय : तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण

सादरकर्ते : आशुतोष टिळक



तेलाच्या किमती हा अत्यंत ज्वालाग्राही प्रश्न. केवळ आजच नव्हे तर गेली ५-६ दशकं आंतरराष्ट्रीय राजकारण त्याभोवती फिरतंय. मध्य पूर्व प्रदेशात युरोपीय आणि अमेरिकेचा हस्तक्षेप वाढला तो मुळी याच मुळे. आंतर राष्ट्रीय बाजारात एक डॉलर प्रति बॅरल ने भाव वाढले तर भारतावर त्याचा ७ ते ८ हजार कोटींचा दबाव वाढतो. या आकडेवारीतूनच तेलांच्या किमतीचे गांभीर्य लक्षात यावे. आजच्या शब्दांगण च्या सत्रात तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय घेऊन बोलणार आहेत जळगावचे *आशुतोष टिळक.*
शब्दांगणच्या आजच्या सत्राचे वक्ते, आशुतोष टिळक आपल्या passionate पण सखोल मांडणीसाठी ओळखले जातात. अर्थविषयक ब्लॉग चालवणाऱ्यांची संख्या तशी कमीच. त्यातही एखादा तरुण लेखक स्वतःहून अर्थविषयक ब्लॉग लिहू इच्छितो हे ही तसे अप्रूपच. विषय ज्वलंत आहे आणि आवश्यक सुद्धा.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२२ : जम्मू-काश्मीर मधील स्त्री-जीवन : सौ. नंदिनी पित्रे

११।०५।२०२३

सत्र २२२वे:

विषय : जम्मू-काश्मीर मधील स्त्री-जीवन

सादरकर्त्या : सौ. नंदिनी पित्रे (हम ट्रस्टच्या कार्यकर्त्या )



शतकानुशतकं अनेक भाषा, अनेकविध कला, विविध संस्कृती इत्यांदींचं माहेरघर असलेलं, खुद्द आदि शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पृथ्वीवरचा स्वर्ग पासून ते शापित नंदनवन म्हणवलं जाण्याचा प्रवास करणारं आपलं धगधगतं काश्मीर !! एकेकाळी प्रगतीच्या आणि समृद्धीच्या यशोशिखरावर असलेल्या या पवित्र आणि समृद्ध भूभागाकडे सुमारे हजार वर्षांपूर्वी सर्वप्रथम इस्लामची विखारी नजर वळली आणि त्यानंतर ती यशोभुमी इस्लामी आक्रमणं, अत्याचार, बलात्कार, सामूहिक कत्तली अशा सततच्या विनाशाच्या वरवंट्याने भयकंपित होत राहिली.

अशा या काश्मीरच्या रमणीय पण तितक्याच दाहक प्रदेशात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काही वर्षांपूर्वी 'हम ट्रस्ट' या संस्थेने जमिनीवर उतरून कामाला सुरुवात केली. या कामादरम्यान आलेले विविध अनुभव आणि त्यातून काश्मीरमधल्या स्त्रीजीवनाविषयी सामोरी आलेली काही सत्यं, वस्तुस्थिती, डेटा यांचं सादरीकरण हा आपल्या आजच्या शब्दांगणच्या सत्राचा विषय आहे . हम ट्रस्ट तर्फे या कामात हिरीरीने सहभागी असलेल्या सौ नंदिनी पित्रे या त्यांना स्वतःला काश्मीरमध्ये काम करत असताना आलेले तिथल्या स्त्रीजीवनाबद्दलचे अनुभव आपल्यासमोर मांडणार आहेत.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २२१ : छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य - नरहर कुरुंदकर : शशांक लखोटे

०४।०५।२०२३

सत्र २२१वे:

पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य

लेखक : नरहर कुरुंदकर

सादरकर्ते : शशांक लखोटे



महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा सम्यक आढावा घेण्याचे प्रयत्न अनेक लेखक, साहित्यकार, विचारवंतांनी केले आहेत. त्यात वेगवेगळ्या आणि प्रसंगी परस्परांहून सर्वस्वी भिन्न अशा विचारधारा असलेल्या लोकांचा समावेश आहे. कोणाला महाराज हिंदू धर्मभिमानी वाटतात तर कोणी महाराजांना सर्वधर्मसमभावाचं पालन करणारे म्हणून रंगवतं. कोणी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतं तर कोणी कुळवाडीभूषण !! अलीकडे तर महाराजांचा मूळ इतिहास बदलण्याचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना निव्वळ विशिष्ट जातीपायी बेदखल केलं गेल्याचं घृणास्पद राजकारण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्याला महत्त्वाचे राजकारणी नेते आणि सरकारकडून उघड उघड पाठींबा मिळाल्याचंही !!

शिवाजीमहाराजांचं वादळी आयुष्य हे कुठल्याही काळात कालबाह्य होऊ शकत नाही हेच खरं! शिवाजी महाराज नक्की कसे होते हे जाणून घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. जागर, शिवरात्र, आकलन, मनुस्मृती सारखं विचारप्रवर्तक लेखन करणारे पुरोगामी विचारांचे अर्ध्वयू असणारे नरहर कुरुंदकरही त्याला अपवाद ठरले तरच नवल. अर्थातच रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या ग्रंथाला कुरुंदकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा माध्यमातून त्यांचा या विषयावरच्या व्यासंगाचा अनुभव आपण घेतलेला आहेच. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांचं जीवनचरित्र जाणून घेताना त्यांनी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना, त्यांचे परिणाम यांची संगती लावून काही महत्त्वाचे निष्कर्षही मांडले आहेत.

अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकाविषयी विचार मांडताना वक्ताही तितक्याच तोलामोलाचा असल्यावर सत्र अधिकच रंगतं हा आपला आजवरचा शब्दांगण चा अनुभव आहे. आजचं सत्र हे नक्कीच अशा रंगतदार सत्रांपैकी एक असणार आहे कारण सत्र घेणार आहे शशांक लखोटे. शशांकचा सर्वच विषयांप्रमाणे कुरुंदकरांच्या साहित्याचाही खूप चांगला अभ्यास आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२० : डिजिटल मीडिया - करिअर घडवणारं टूल : ओंकार दाभाडकर

२७।०४।२०२३

सत्र २२०वे:

विषय : डिजिटल मीडिया : करिअर घडवणारं टूल

सादरकर्ते : ओंकार दाभाडकर



आयटी क्षेत्रातील उत्क्रांतीमुळे नव्वदीच्या दशकात मल्टिमीडिया हा शब्द उदयास आला. त्यानंतरच्या जेमतेम पाव शतकभरातच मल्टिमीडिया ते डिजिटल मीडिया हा प्रवास आपण अत्यंत वेगाने होताना बघितला. या प्रवासात अनेक टप्प्यांवर लागलेल्या अनेकानेक छोट्या मोठ्या शोधांमुळे मानवी जीवन अधिकाधिक सुखकर झाल्याचं आपण अनुभवलं. पण त्या जोडीलाच या शोधांमुळे जन्माला आलेले सायबर क्राईम, हॅकिंग सारखे दुष्परिणामही आपण बघितले. डिजिटल किंवा सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे अशा प्रकारचं वाक्य कदाचित त्यामुळेच जन्माला आलं असावं.

डिजिटल मीडिया चा उपयोग वाचन करणे, व्हिडीओ बघणे, जोक्स वाचणे, रिल्स बघणे, राजकारणाशी संबंधित समूहांबर आपापल्या दादा, साहेब, दाजींच्या नावाने वितंडवाद घालणे एवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग आपलं करिअर घडवण्यासाठीही करता येऊ शकतो याची जाणीव काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींना फार लवकर झाली.

अशा काही निवडक व्यक्तींपैकी एक जण म्हणजे *ओंकार दाभाडकर* . ओंकार दाभाडकर आज शब्दांगणच्या सत्रात त्यांचे डिजिटल मीडिया विषयीचे अनुभव, त्यांचा प्रवास, त्यांचं व्हिजन आपल्यासमोर मांडणार आहेत. आवर्जून अनुभव घ्यावा असं हे सत्र! नक्की ऐका!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २१९ : ChatGPT : केदार मराठे

२०।०४।२०२३

सत्र २१९वे:

विषय : ChatGPT

सादरकर्ते : केदार मराठे



AI अर्थात आर्टिफिशिअल इंटलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) इत्यादी शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांत आपल्या परिचयाचे झाले आहेत. या शब्दांची ओळख होऊन ते स्थिरावत असतानाच काही महिन्यांपूर्वी एक सातअक्षरी वादळ अचानक घोंघावत आलं आणि त्याने येत्या काही वर्षांत आपण सगळी क्षेत्रं कशी लीलया काबीज करू शकतो याची चुणूक दाखवायला प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे याचे फायदे तोटे गणले गेले, उपयुक्ततेचा विचार केला गेला, भविष्यात अजून किती प्रगती होईल याचे आडाखे मांडले गेले. पण अर्थात या क्षेत्राबद्दल आपल्याला निदान अजून तरी खूप तुटपुंजी माहिती आहे किंवा त्याच्या क्षमतेचा कदाचित पूर्ण अंदाज आपल्याला यायचा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपण कशाबद्दल बोलतोय हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आलं असेलच. तर त्या सातअक्षरी वादळाचं नाव आहे ChatGPT. आपलं या आठवड्याचं शब्दांगण सत्र याच विषयावर आहे. आणि सत्र घेणार आहेत केदार मराठे.

केदारने गेल्या वर्षी Life 3.0 या पुस्तकावर आणि तद्नुषंगाने आर्टिफिशिअल इंटलिजन्स या विषयावर घेतलेलं सत्र अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण झालं होतं हे आपल्या स्मरणात असेलच. अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगण्याची विशेष हातोटी असलेल्या केदारचं ChatGPT वरचं सत्रही तितकंच अप्रतिम होईल याची खात्री आहेच. तर ChatGPT या नवीन स्फोटक, रंजक विषयाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असलेल्यांनी या सत्रासाठी आवर्जून उपस्थित राहायला हवं. नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २१८ : कर्मचारी - व.पु. काळे : जयंत करकरे

१३।०४।२०२३

सत्र २१८वे:

पुस्तक : कर्मचारी

लेखक : व.पु. काळे 

सादरकर्ते : जयंत करकरे



वपु ही दोन अक्षरं उच्चारता क्षणी पार्टनर, प्लेजर बॉक्स, आपण सारे अर्जुन, कर्मचारी, तप्तपदी, वपूर्वाई, वपुर्झा अशा अनुभवसंपन्न आणि दर्जेदार लेखनाची मालिका कुठल्याही दर्दी वाचकाच्या डोळ्यांसमोरून तरळून जाते. जुन्याजाणत्यांना वपु परिचित असतात ते कथाकथनामुळे तर नवीन पिढीला त्यांची ओळख झालेली असते ती दैनंदिन व्हॉट्सअप फॉरवर्ड्समुळे. वपुंच्या कथा या प्रामुख्याने मध्यमवर्गीय जीवनाची सुखदुःखं केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या असतात. अशाच मध्यमवर्गीय, नोकरदार माणसांच्या दर्जेदार कथांचा संग्रह म्हणजे *'कर्मचारी'* . आणि पुस्तक परिचय करून देणार आहेत ते दर्दी वाचक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री जयंत करकरे. व्यवसायाने सीए असलेल्या जयंत करकरे हे चतुरस्र वाचक म्हणून आपल्याला परिचित आहेतच. श्री करकरे यांनी यापूर्वीही शब्दांगण मध्ये सत्र घेतलं आहे.
   
कर्मचारी मधल्या अनेक कथांना खास वपुंचा परिसस्पर्श तर आहेच पण शेवटी वपुंच्या खास शैलीत बसणारा धक्काही आहे. या आगळ्यावेगळ्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी शब्दांगणच्या सत्रासाठी सर्वांना खास आमंत्रण. वपुप्रेमींना आमंत्रण द्यायची गरजच नाही. कारण 'कर्मचारी' म्हंटल्यावर सच्चे वपुप्रेमी जातीने हजर राहणार यात शंकाच नाही. सर्वांनी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २१७ : भारताच्या आर्थिक विकासासाठी सक्षम पेटंट प्रणालीची उभारणी : निलेश पावसकर

०६।०४।२०२३

सत्र २१७वे:

विषय : भारताच्या आर्थिक विकासासाठी सक्षम पेटंट प्रणालीची उभारणी

सादरकर्ते : निलेश पावसकर



आपले आजोबा कितीही उंच असले तरी आपली उंची आपल्यालाच गाठायला लागते. अशा अर्थाची एक म्हण आहे.
भारताचा इतिहास आणि परंपरा कितीही वैभवशाली असला तरी आजचा भारत समर्थ बनवायचा असेल तर आजचे सामर्थ्याचे निकष समजून घ्यायला हवेत आणि त्यानुसार आपली मार्गक्रमणा ठरायला हवी.

उद्याचं शब्दांगण चं सत्र खूप महत्त्वाचं यासाठी आहे की ते आजच्या भारताला सामर्थ्यशाली बनवण्याचा विचार करतं. पेटंट च्या माध्यमातून भारतीय संपत्ती भारतात राहावी आणि इतरत्रही निर्माण होणाऱ्या संपत्तीचा भारतात ओघ यायचा असेल तर
आपल्याला जाणीवपूर्वक बौद्धिक संपदेचा वापर करायला हवा...
 या विषयाला वाहून घेत एक उच्च विद्याविभूषित युवक वेगळ्या अर्थाने संन्यस्त जीवन जगतो. निलेश पावसकर या समर्पित व्यक्तीचे प्रभावशाली विचार ऐकायला उद्याच्या शब्दांगण सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहावे ही विनंती.

आपल्या समूहात अनेक जण असे आहेत जे आपल्या वर्तुळात प्रभावशाली आहेत. आपण हा विषय समजून घेतलात तर समाजात त्यादृष्टीने प्रबोधन होईल...विशेषतः जे प्रतिभावान तरुणांबरोबर काम करतात, जे अध्यापन क्षेत्रात शालेय अथवा महाविद्यालयीन स्तरावर काम करतात त्या सर्वांनी तर नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...