Thursday, May 26, 2022

सत्र १७४ : माई सावरकर एक समिधा : साधना जोशी

 २६।०५।२०२२

सत्र १७४ वे:

विषय : माई सावरकर एक समिधा

सादरकर्त्या : साधना जोशी

मंडळी आजचे शब्दांगण चे १७४ वे सत्र. साधना जोशी घेत आहेत ते ही माई सावरकरांवर . स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती २८ मे ला आहे. त्यानिमित्ताने आजचं सत्र त्यांच्या पत्नीवर होतंय. आपल्याला अनेकदा राष्ट्रीय नेत्यांचे कर्तृत्व माहीती असते परंतु ते कर्तृत्व गाजवताना त्यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या रणरागिणींचे कर्तृत्व कळतेच असे नाही. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर राष्ट्रप्रेमाचा जळता अंगार पदरात घेणं कसं असेल? आणि चिमण्या कावळ्यांचा संसार नाकारणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा संसार निभावून नेताना किंवा अंदमानच्या कारावासात खितपत पडलेल्या क्रांतिकारकांच्या पत्नीच्या भावना नक्की कशा असतील? 

सलभ बन जलना सरल है, प्रेम की जलती शिखापर,   

स्वयं को तिल तिल जलाकर दीप बनना ही कठीण हैं 

हे नक्कीच..पण असं असलं तरीही माजघरातील समई सारखं समर्पित आयुष्य जगणाऱ्या माई सावरकर. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी आज नक्की भेटूयात.


काही अपरिहार्य कारणामुळे या सत्राची यूट्यूब लिंक सध्या उपलब्ध करुन देता येत नाही त्याबद्दल क्षमस्व ! लवकरच या सत्राची लिंक उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Thursday, May 19, 2022

सत्र १७३ : मुक्काम - गौरी देशपांडे : पालवी मोघे

 १९।०५।२०२२

सत्र १७३ वे:

पुस्तक : मुक्काम

लेखिका : गौरी देशपांडे

सादरकर्त्या : पालवी मोघे



स्त्रीपुरुष संबंधांचं संपूर्ण आकलन कुणाला झालंय? आणि तरीही या विषयावर काही वाचायचे किंवा लिहायचे आकर्षण सुद्धा कुणाला चुकलंय? 

'तेरी राहों मे बारहा रुककर, हमने अपनाही इंतजार किया! असं सहजच गुलझार लिहून जातो. स्त्री पुरुष संबंधांमध्ये नात्यांचे अर्थ लावताना, त्यात नीती अनीती चे धागे शोधताना, रूढ सामाजिक संकेत पाळताना किंवा ते तोडताना आणि त्याबद्दल वाचताना सुद्धा आपल्या स्वतःलाही नकळत आपण आपलाच धांडोळा घेऊ लागतो. आपल्या नात्यांची वीण घट्ट करू पाहतो... हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आजचं शब्दांगणचं सत्र...    गौरी देशपांडे लिखित 'मुक्काम' पुस्तकावर पालवी मोघे -लखोटे आजचे सत्र घेतेय. तथाकथित नैतिकतेला, नातेसंकेतांना धक्के देत, जगण्याची नैसर्गिक लय साधत, भल्याबुर्‍या अनुभवांना, सहज सामोरं जात, स्त्री-पुरुषसंबधांचे नवनवे पैलू उलगडत जाणारं हे पुस्तक वाहत्या, उसळत्या जीवनाला सदैव सन्मुख राहण्याचा स्वभाव असलेल्या पालवीला आणि किंबहुना विचार स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या सर्वच तरुणींना / महिलांना आवडले नाही तरंच नवल... नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Thursday, May 12, 2022

सत्र १७२ : झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स : तन्वी मेस्त्री

 १२।०५।२०२२

सत्र १७२ वे:

विषय : झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स

सादरकर्ते : तन्वी मेस्त्री



झेन अँड दि आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स हे नाव पाहिल्यावर ' केहेना क्या चाहते हो ? ' अशा प्रकारची उत्सुकता मनात निर्माण होते. हे नक्की झेन तत्त्वज्ञान विस्तृतपणे मांडणारं पुस्तक आहे की आणखी काही असा प्रश्नही पडू शकतो पण खरंतर झेन किंवा मोटर सायकल मेंटेनन्स या दोन्ही विषयांबद्दल नसलेलं हे पुस्तक या दोन्ही रुपकांतून नेमकं काय मांडतं हे जाणून घेण्यासाठी आजच्या सत्राला नक्की या.मोटरसायकलवरून केलेल्या प्रवासाची ही गोष्ट,  नव्हे मोटर सायकलची गोष्ट ... ही मोटर सायकल साधी नाही. मानवी जीवनातील पेच आणि आव्हाने यांचं प्रतीक ! तिच्या देखभालीत दडली आहे त्यांची उत्तरं ! मोटर सायकल सुरळीत चालणे म्हणजे दर्जेदार नैतिक जीवन जगणं. म्हणजे मोटर सायकलची देखभाल हे एक तत्त्वज्ञानच !   एक अनोख्या विषयावरील पुस्तक आणि अतिशय रंजक आणि मुद्देसूद पद्धतीने विषय मांडणारी वक्त्री अशा दुहेरी योगाचे साक्षीदार होण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



Thursday, May 5, 2022

सत्र १७१ : मुद्राराक्षस : डॉ. नम्रता जगताप

०५।०५।२०२२

सत्र १७१ वे:

विषय : मुद्राराक्षस

सादरकर्ते : डॉ. नम्रता जगताप



-अहो कोण तुम्ही?? आमच्या आचार्य चाणक्यांना ज्ञान देतो म्हणणारे.. आचार्य सर्वज्ञ आहेत😡

- असे काही नाही बरं का... सगळ्यांनाच सगळे काही माहीत नसते...आता चंद्र🌙 कोणाकोणाला आवडत नाही हे तुमच्या आचार्यांपेक्षा मलाच माहीत आहे.😉



हा संवाद वाचून नक्कीच कोड्यात पडला असाल...चाणक्यांना ज्ञान देणारा हा कोण डुढ्ढाचार्य..आणि कसलं ते ज्ञान..कोण हा चंद्र? तर हा संवाद आहे चंद्रगुप्त मौर्याविषयीचा..विशाखादत्त लिखित मुद्राराक्षस या नाटकातला..

आजच्या काळात राजकीय विषयांवरील कलाकृती या नेहमीच लोकप्रिय ठरतात..यासाठी  सिंहासन, सामना किंवा अगदी अलीकडील आजचा दिवस माझा यांसारख्या चित्रपटांची देखील उदाहरणे देता येतील..पण जवळपास हजार वर्षांपूर्वी..जेव्हा नायक-नायिकांची प्रणयप्रधान नाटके लोकप्रिय असताना नायिका नसलेलं आणि केवळ राजकीय शह-काटशहांनी रंगलेलं मुद्राराक्षस हे नाटक निश्चितच आपलं वेगळं स्थान निर्माण करतं..पण असं‌ काय आहे नेमकं या नाटकात? चाणक्याच्या स्वभावाचे कोणते पैलू नाटकातून समोर‌ येतात? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...