८ ऑगस्ट २०२०
सत्र ३३- शशांक कुंभारे
पुस्तक- तोत्तोचान
लेखिका - तेत्सुको कुरोयानागी
तोत्तोचान ही एका लहान मुलीची, तिच्या शाळेची गोष्ट आहे. आणि बॅकग्राऊंडला दुसरं महायुद्ध आणि अर्थातच बॉम्ब.तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ (?) शिक्षकांसाठी पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, लाडकी 'तोमोई' शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक 'कोबायाशी', त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास...हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं! कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. यातलं तू खरोखरच एक छान मुलगी आहेस हे वाक्य आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जातं. आपण मुलांशी बोलताना त्याना रागवताना मुलांना नकळत तू मठ्ठ्च आहेस ,ढ आहेस किंवा तू असा वेंधळाच आहेस, धांधरट आहेस अशी लेबले लावत असतो. मुलंही त्यांच्या नकळत ती दूषणे स्वीकारत असतात आणि त्यांचा आत्मविश्वास खच्ची होत असतो. या पुस्तकातली चित्रे पाहुन हे पुस्तक लहान मुलांसाठी असेल असे वाटले पण प्रत्यक्षात काही वेगळेच आहे. विदारक अनुभव थरारक, बुद्धीला सतत आव्हान देणारे रहस्य ...असे काहिही नसताना तोत्तोचान आपल्याला भारून टाकते. साध्या सोप्या शब्दात कोणतीही बौद्धीके न पाजता प्रगल्भ करून जाते.
"तारे जमीन पर" चित्रपट पहाताना हे पुस्तक वारंवार आठवते.
"Every Child is a special child" आणि
"तू खरोखरच एक छान मुलगी आहेस" हे फार काही वेगळे वाटत नाही.
No comments:
Post a Comment