Tuesday, December 7, 2021

प्रतिक्रिया

 

प्रतिक्रिया

१) मंडळी, शब्दांगण ला आज तारखेने 2 वर्ष पूर्ण झाली. इवलेसे रोप लावीयेलें दारी.. असं म्हणण्याची पद्धत आहे. अर्थात हा वेलु गगनावरी गेला अशी माझी  भावना नाही. 2 वर्ष हा फक्त  एक आकडा आहे. तो महत्वाचा का कारण त्या निमित्ताने 150 च्या वर सभासदांनी कधी ना कधी या सत्रांचा आनंद त्यांच्या आवडी ने घेतला. अनेक जण समूह सोडूनही गेलेले आहेतच. पण या 150 - 175 जणांमध्ये अनेक जण खऱ्या अर्थाने ज्ञान तृष्णा असणारे आहेत . निदान काही जणांना तरी गुरुवार  म्हटला की शब्दांगण आठवतं. काही जण आपलं काम ऑफिस शब्दांगणच्या सूत्रानुसार ऍडजस्ट करून सत्राला उपस्थित राहतात. 

या दिडशे जणांना आपले विचार प्रस्थापित करायला एक हक्कांचं व्यासपीठ मिळालं याचा आनंद आहे आणि ते ते हक्काने वापरतात याचाही आनंद आहे. विचारधारा कोणतीही असो तिचे स्वागत आहे आणि  वाद विवादांची परंपरा येथे कायम राहो अशी इच्छा आहेच.

ही दोन वर्षे कशी गेली हे कळलेच नाही. एकही गुरुवार वक्ता नाही म्हणून सत्र नाही असं झालं नाही हे विशेष. आणि वेगवेगळे विषय इथे सादर झाले त्याचा आनंद. सर्वोत्तम ते अजून व्हायचे आहे याची खात्री आहेच आणि ते येणाऱ्या काळात सुद्धा होईल याची ही खात्री आहे. पण हा आलेख चढता राहावा यासाठी वाचक श्रोत्यांची संख्या मात्र 25 - 30 च्या घरातून 35 - 40 दरम्यान जावी अशी सुद्धा इच्छा आहे. 

ज्ञानाने मनाने आणि अनुभवाने आपल्यात सर्वात ज्येष्ठ असलेल्या    मंगलाताई ओक, आणि वयाने सर्वात लहान असलेला शार्दुल पालकर ज्या उत्साहाने शब्दांगण ऐकायला येतात त्याचाही आदर्श आपण ठेवला पाहिजे असं वाटून जातं. 


तुम्हाला शब्दांगण बद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यातही आम्हाला रस आहे. तुमची मते नक्की कळवा!

- विनोद देशपांडे, अध्यक्ष, ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी

२) 👍🏻👍🏻👍🏻

उत्तरोत्तर शब्दांगण असेच बहरत राहो.. विचारांच्या असंख्य तारकांनी सदैव चमकून उठावे अशी मी ईच्छा करते

खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!!
- वृंदा कुलकर्णी, ज्येष्ठ वकील

३) शब्दांगण..... माझं,तुमचं,आपलं शब्दांगण...मला आठवतंय नोव्हेंबर २०१८ मध्ये आमची मिटिंग झाली होती,नव्याने स्थापन झालेल्या आपल्या ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कोणते उपक्रम आपण घेऊ शकतो म्हणून आम्ही काही जणं भेटलो होतो...त्या मीटिंग मध्ये ठरलं की बुक क्लब सारखं काहीतरी करूया.सर्वांना सोयीचा वार आणि सोयीची वेळ ठरली गुरुवार, संध्याकाळी ८:१५ वाजता. नावाचा उगम पण लगेच्याच बैठकीत झाला...अचानक कोणाच्यातरी तोंडून हे नाव निघालं, सगळयांना आवडलं, समर्पक वाटलं. पहिलं पुस्तक कोणी मांडावे असा प्रश्न पडला..मग आमच्यातल्याच एकाने rather एकीने गांधींचं आत्मचरित्र, 'सत्याचे प्रयोग' मी मांडते म्हणून पुढाकार घेतला.आणि मग त्याच्या पुढच्या गुरुवारी अर्थात, ६ डिसेंबर २०१८ ला शब्दांगणचं पहिलं सत्र पार पडलं. आणि ही मालिका अजून सुरू आहे आणि पुढेही राहिलंच याची मला खात्री आहे. या मागच्या ९९ सत्रात शब्दांगांच्या व्यासपीठावर अनेक प्रयोग झाले. काहींनी आपली आवडती पुस्तकं मांडली, तर काहींनी आपली आवडती पात्रं, आवडते लेखक उलगडते केले. चंद्रशेखर टिळक सर, पेंढारकर सर, गोखले सर यांनी स्वतःची पुस्तकं मांडली, काहींनी आपला PhD चा विषय मांडला तर कधी सर्वांनी मिळून कवितांचं सत्र गाजवलं. शब्दांगण ने आपल्या सर्वांना एक हक्काचे व्यासपीठ दिलं.नवकवींना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली, आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टिळक सर, कुलकर्णी सर यांसारखे यशस्वी लेखक, कवी यांनीही आपल्या कविता , गझल अगदी मोकळेपणाने सादर केल्या. अगदी विष्णूगुप्त चाणक्य, उपनिषदे यांपासून इंग्रजीतल्या आताच्या नावाजलेल्या लेखकांची पुस्तके, नवनाथ गोरे यांसारखे नुकतेच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले साहित्यिक यांची पुस्तके ऐकायला मिळाली. बालदिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला तर लहान मुलांचे वाचन आणि आत्मविश्वास बघून थक्कच झालो. शब्दांगणची रेंज खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे आणि ती अजूनच वाढत जाणार यात शंका नाही..खरंतर मी खूप कमी पुस्तकं वाचली आहेत, पण शब्दांगणमुळे खूप नवनवीन पुस्तकांची तोंडओळख झाली, खूप काही शिकायला मिळालं. रारंगढान ने जिद्द म्हणजे काय ते शिकवलं, सत्याचे प्रयोगाने सत्याची ताकद शिकवली, तोतोचान ने मूलभूत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं,रक्तलांच्छित ने फाळणीचे वास्तव समोर ठेवलं तर ग्रेटा थनबर्ग च्या पुस्तकाने एक छोटीशी मुलगी धैर्याने कशी संपूर्ण जगाला ठणकावून प्रश्न विचारू शकते आणि पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे देखील अधोरेखित केले. असो.

शब्दांगण ला १०० व्या सत्रासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच हजार, दहाहजार, दहा लाख सत्र होवो हीच सदिच्छा.या गुरुवारी नक्की या आपल्या शब्दांगणच्या १०० व्या सत्राला...भेटू..धन्यवाद...🙏🏼🙏🏼
- शशांक लखोटे

४) #शब्दांगणशतकपूर्ती

सगळेच आपण आज शब्दांगण च्या शतकपूर्तीचा आनंद साजरा करत आहोत. खरोखर किती लिहावं किती नको असं झालंय, गेली जवळपास २ वर्षं गुरुवार आला की शब्दांगणला जायचं‌ हा नेम झाला आहे. अगदी काही कारणामुळे एखादं सत्र चुकलं तरी चुकचुकल्यासारखं‌ वाटायचं. शब्दांगणचा मला वैयक्तिक फायदा म्हणजे वयाने,ज्ञानाने आणि अधिकाराने सर्वार्थाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींशी समान पातळीवर येऊन चर्चा करता आली. त्यांचा सहवास लाभला आणि आपला थोडाफार अभ्यास कौतुकाने ऐकून घेणारी आणि अजून मार्गदर्शन करणारी मंडळी इथे भेटली. अनेक लोकांशी नव्याने संपर्क झाला. आणि अनेक नवीन पुस्तकांचा आणि विषयांचा परिचय झाला.

शब्दांगणचं प्रत्येक सत्र हे एक संपूर्ण पुस्तक वाचण्याचा अनुभव देऊन जातं. कठोपनिषद,गीतारहस्यासारखे गहन विषय सोप्या भाषेत समजून घेता आले. त्याचबरोबर हॅरी ते बोक्या, तोत्तोचान अशा सर्वांना‌ एका धाग्यात गुंफणाऱ्या सत्रांमधून मनसोक्त चर्चा करता आली. स्वतः कवी नसूनही इतरांच्या भावलेल्या कविता सादर करता आल्या😅 आणि बाकीच्यांच्या अत्यंत सुंदर कविता ऐकायला मिळाल्या. विनोद सर, नीरज सर, टिळक सर, अजिंक्य सर आणि सगळेच माझ्या सारख्या नवख्या विद्यार्थ्याचं बोलणं त्याच गांभीर्याने आणि कौतुकाने ऐकतायत हे बघून नवीन विचार मांडायला हुरुप‌ आला. नुकतंच झालेलं बालवाचकांचं सत्र ऐकून त्यांच्या वाचनाची थक्क करणारी रेंज कळली. हे सगळं‌ मोजक्या शब्दांत सांगता येण्यासारखं नाही. शब्दांगण परिवाराने साजरा केलेला माझा वाढदिवस, साहित्ययात्री आयोजन, सत्रानंतरची चहापार्टी अशा अनेक चांगल्या आठवणी शब्दांगणने दिल्यात, यापुढेही नक्कीच मिळतील याची खात्री आहे आणि शंभरावं सत्र ही अशीच संस्मरणीय आठवण ठरणार आहे,

त्यामुळे नक्की भेटुया शब्दांगणच्या शतकपूर्ती सत्राला☺️☺️☺️

- शौनक पिंपुटकर

५) Spruha,donghi shashank, shaunak, ridhi, palavi, zelam..ani ajun anek hath shabdangan sathi manapasun talmaline zatat aahe...sagalyan chya rupat shabdagan mule vaiyktik aayushat ratna cha bhandar cha mala milala aahe as mala vatat. Vaze sir, Heramb,Ajinkya, Vinod sir tumchya sagalyanmule vaicharik mashagt hotat. Jayant kaka, kaku, manish dada, karakare sir tumhi tumacha khajina aamachya sathi rita karat asata, ha aamachya varcha lobh asach rahu de. Sagalyan cha yogdar amulya aahe.🙏 aapan sagale milun shabdangan cha 1000 karyakram dankyat karuya. 😀

- वृषाली देशपांडे

६) मी खरंतर नाशिकचा रहिवासी दिग्दर्शन आणि लेखनात काही करु पाहण्यासाठी मुंबईत येत असतो....

अतुल्यभारत चे मला सदस्य होता आले त्या कुशाग्र विचारांचा मला लाभ झाला.😊

त्या अनुषंगाने विनोद सरांकर्वी मला शब्दांगणला पण येता आले हे मी माझे सौभाग्य समजतो.😊

.आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून शब्दांगणचा प्रत्येक भाग हा कसा उत्तम होईल; शब्दांगणच्या प्रत्येक सदस्याला एका उत्तम विचारसंचयाचा(पुस्तकाचा) लाभ कसा होईल आणि आजच्या डिजिटल जगात आपली वाचनाची रुची कशी जोपासता येईल ह्यासाठीचा विनोदसरांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न निस्वार्थ रितीने गेली २वर्ष चालू आहे तो पुढील अनेक वर्षे असाच चालू राहो आणि त्यात मलापण सहभाग देता यावा हिच ईच्छा मनाशी बाळगून आहे.🙏😊

- योगेश चंद्रात्रे

७) अच्युत गोडबोले यांच्या मुसाफिर पुस्तकात म्हटलं आहे की एखाद्या व्यक्तीची जडणघडण दोन गोष्टींवर अवलंबून असते , एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेली चांगली माणसं... अशा दोन्ही अंगांनी मला घडवणारा उपक्रम म्हणजे शब्दांगण ! लहानपणापासूनच घरी सगळ्यांनाच वाचनाची आवड असल्याने आपसूकच मला वाचनाची सवय लागलेली होतीच पण आपल्या सारखीच किंबहुना आपल्याहून कितीतरी पटीने अधिक चांगलं दर्जेदार वाचणारी माणसं इथे मला भेटली आणि त्यांनी मला त्यांच्यात अगदी सहजपणे सामावून घेतलं. 

अतुल्य भारत व्याख्यानमालेनंतर ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीच्या कामाबद्दल माहिती होती आणि त्यातच जाई ताईने ( वैशंपायन) शब्दांगण या उपक्रमाबद्दल सांगितले आणि मी इथे यायला लागले. इथल्या काही जणांना मी जुजबी ओळखत होते, काही अगदीच अनोळखी होते पण वयाचं, अनुभवाचं असं सगळं अंतर इथे आपसूकच गळून पडलं आणि अनेक ज्येष्ठ व्यक्तींबरोबर सुद्धा मोकळेपणाने बोलता आलं. 

गेल्या दोन वर्षांच्या काळात मी अनेक मराठी इंग्रजी पुस्तकं उदाहरणार्थ, Animal Farm, एका दिशेचा शोध, वंगचित्रे, आवरण, दुर्गाबाई भागवत यांची पुस्तके, जागर, The Hindu View of Life अशी अनेक पुस्तके केवळ आणि केवळ शब्दांगण च्या प्रेरणेतून वाचली. आणि त्याच बरोबरीने आता अनेक पुस्तकं वाचताना 'हे शब्दांगण मध्ये आपण मांडायलाच हवं' अशी एक इच्छा मनात निर्माण होते हे मला आज आवर्जून नमूद करावसं वाटतं. 

याच जोडीला साहित्य यात्री या स्पर्धेमध्ये आधी स्पर्धक आणि मग आयोजक असा दोन्ही बाजूंचा अनुभव घेता आला आणि खूप काही शिकता आलं

खरंतर शब्दांगण म्हणजे फक्त गुरुवारी एक तास होणारं सत्र नाही तर गुरुवारी ऐकलेलं पुस्तक त्यानंतर वाचण्यासाठी आणि गुरुवारआधी वाचलेलं पुस्तक गुरुवारी मांडण्यासाठी मिळणारी प्रेरणा म्हणजे शब्दांगण आहे असं मला वाटतं.

अजुन एक गोष्ट ज्याशिवाय शब्दांगण अपूर्ण आहे असं वाटतं ती म्हणजे आपल्या या ग्रुप वरची वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा.. एखाद्या पुस्तकातला आवडलेला परिच्छेद जसा आपण आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबीयांना वाचून दाखवतो तसंच बऱ्याच वेळा मी आपल्या ग्रुप वरच्या चर्चेतला एखादा आवडलेला मुद्दा घरी आईबाबांना वाचून दाखवत असे. व्हॉट्सॲप ग्रुप वरच्या चर्चांमध्ये सुद्धा दर्जेदार विचार मांडणारा असा हा समूह आहे ! 

कित्ती काय काय लिहू , खूप खूप व्यक्त व्हावं असं वाटणं हीच तर इथली खासियत आणि म्हणूनच इथे एकदम आपल्या comfort zone मध्ये आल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटावं,  सत्र झाल्यावर चहा पिता पिता चर्चा करावी, साहित्य यात्रीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये एकत्र भरपूर काम करायला मिळावं अशी मनापासून इच्छा आहे. तोपर्यंत ऑनलाईन भेटायचं आहेच आहे. 

लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, या महिन्यात गुरुवारी अनेक व्रतं वैकल्य केली जातात. आपल्यासारख्या वाचन प्रेमींसाठी शब्दांगण सारखं दुसरं कुठलं व्रत असूच शकत नाही. तेव्हा हा वाचन वसा असाच जोपासुया आणि भेटूया दहा तारखेला, गुरुवारी, शंभराव्या सत्रात...🙏

- रिद्धी करकरे

८) 🌸शब्दांगण🌸

१०० सत्रांचा टप्पा ओलांडत आहे. जिव्हाळ्याने जोडले गेलेले सदस्य भरभरून लिहीत आहेत! वाचनाने, अनुभवाने ज्येष्ठ अशा सगळ्यांकडून कौतुक होतंय, शुभेच्छा मिळतायत! खूप छान वाटतंय!

या सत्रांमुळे दर गुरुवारची तयारी, उत्सुकता, भेटणं, ऐकणं, त्यावर चर्चा असं एक वेगळं रूटीन तयार झालं गेल्या दोन वर्षात. वक्ते, विषय ठरणं, सगळ्यांसाठी मेसेज तयार करणं, वर्गातली तयारी  ( यात रजिस्टर, कॅमेराची व्यवस्था यासोबत सुवाच्च अक्षर असणारे श्रोते हेरणंही 😉 आलं), आता झुम, फेसबुक ची तयारी अशी आयोजनातील मजाही अनुभवता आली, शिकता आलं. यादरम्यान नवीन सोबती मिळाले ज्यांच्या साथीने ही सत्र सुरळीत पार पडली आणि यापुढेही पडतील! 

इथे ज्येष्ठ वक्ते, नवीन विषय ऐकायला मिळाले. अनेकदा वाचलेलं एकच पुस्तकही समर्थ वक्ते किती वेगळ्या पैलुंद्वारे मांडतात हेही अनुभवता आलं. माझ्या थोड्या थोडक्या वाचनाला व्यक्त होण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं.

बऱ्याचदा 'आमच्या वेळी अनेक व्याख्यानं, भाषणं, चर्चासत्र व्हायची, आम्ही ऐकायचो' असं पालक सांगत असतात. शब्दांगणच्या माध्यमातून आता आपल्या आसपासही नियमितपणे ऐकण्याची - बोलण्याची संधी उपलब्ध झाली याचा आनंद आहे.

यामधून होणारं पुस्तकांचं, माणसांचं, विचारांचं अभिसरण अव्याहत सुरू राहो याच सदिच्छा! 🙏🏼😌

- पालवी मोघे

९) - मंगला चौधरी


१०) #शब्दांगणशंभरी 


खरं तर अतुल्य भारत या कार्यक्रमामुळे आम्ही शब्दांगणशी जोडले गेलो. भारताच्या अतुल्यतेबद्दल वस्तुनिष्ठ विवेचन ऐकताना इतरही विषयांची उत्सुकता होतीच, तिला शब्दांगणचा मार्ग मिळाला. २०-२५ जणांच्या उपस्थितीत होत असला, तरीही शब्दांगण कार्यक्रमाची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, कारण हे माध्यम सामान्य वाचकांना केवळ पुस्तकाची कथा मांडण्यापलिकडे त्यातून त्यांना व्यक्तिश: काय  गवसलं, काय भावलं हे सांगायचं आपलंसं व्यासपीठ मिळवून देते.

या संकल्पनेची जेवढी महती आहे, तेवढीच किंवा त्याहून अधिक, श्रोतेसमूहाची आणि सादरकर्त्यांची. कारण आताच्या फेसबुक लाईव्ह लाटेमध्ये 'वक्ता प्रतिसहस्रेषु श्रोता भवति वा न वा' अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. नव्याने आकाशात येऊ पहाणार्‍या तरूण ध्रुवतार्‍यांना मत मांडण्यापेक्षा मत खोडून काढणार्‍या ट्रोलर वृत्तीपासून बाहेर ठेवण्याचं, समूहाच्या उद्देशानुरूप पोस्ट करण्याचं मोठं मोलाचं कार्य समूहातील थोरली जाणकार मंडळी करत आहेत. तेच व्हॉट्स्अॅपसारख्या माध्यमावर अपेक्षितही आहे.

मला नोकरी-अभ्यासात असल्यामुळे कमी सत्रांना प्रत्यक्ष हजर रहता आलं आहे, पण आता फेसबुकमुळे (लॉकडाऊन सुरु झाल्यापासूनची) जुनी सत्रंही सोयीनुसार परत पाहता येतात. सत्रांच्या वैविध्यामुळे ज्या दिवशी जशी लहर येते, तसं ते ते पुस्तक चाळल्यासारखं सत्र पाहता येतं. स्वत: सादर करत असताना सहभागी होणार्‍यांच्या माना सहमतीने डोलताना दिसल्या की खूप मानसिक समाधान मिळतं. माझं वक्तृत्व फारसं चांगलं नाही, तरी केलेल्या प्रयत्नांना जितका आदर आणि आधार सदस्यांकडून मिळतो, त्यातून पुन्हा पुढच्या वेळी अजून चांगलं करावं असा हुरुप वाढत राहतो. 

पण सर्व वक्ते माझ्यासारखे मर्यादित नाहीत, तर अनेक उत्कृष्ट अभ्यासक, कलाकार, प्रकाशक, व्याख्यातेही आपल्याला लाभले आहेत. साहित्ययात्री सारखी वाचन-लेखनाचा पुरस्कार करणारी अद्भुत स्पर्धाही निर्माण झाली आहे. यातून समूहाचा आलेख आणि आवाकाही वाढतो आहे. याची उत्तरोत्तर वृध्दी होण्यासाठी आपण प्रत्येकाने इतर व्हॉट्सअप समूहांवर इथले शब्दांगण सत्र निमंत्रण तरी नक्कीच पाठवायला हवे, फेसबुक लाईव्ह आणि झूमची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, ही सर्वांना आग्रहाची विनंती.
- चिन्मय पुराणिक


 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...