Saturday, January 13, 2024

शब्दांगणबद्दल थोडेसे...

                                                                     


शब्दांगण


 शब्दांगण हा ‘ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीचा’ एक सांस्कृतिक उपक्रम आहे. ही आहे एक साहित्य चळवळ, तुमच्या आमच्यासारख्या वाचनप्रेमींसाठी एक व्यासपीठ.

📚 वाचन संस्कृती📚 जोपासण्याचा एक प्रयत्न!सर्वांनी उत्तम साहित्य वाचावे, जे आपल्याला आवडले ते इतरांना सांगावे, इतरांनी वाचलेले आपण ऐकावे, शब्दांगणात बागडावे, आनंदसागरात बुडुन जावे अशी यामागची कल्पना.😇 रसिक वाचक आपल्याला भावलेल्या मराठी , इंग्रजी पुस्तकांचा परिचय इतरांना करून देतात. विषयाला काही बंधन नाही. यात अगदी रहस्यकथा ते गीतारहस्य अशा अनेक प्रकारांवर  सत्रे झाली.हा जरी प्रामुख्याने एक पुस्तक परिचयाचा कार्यक्रम असला तरी इथे केवळ पुस्तकांवरच चर्चा होते असे नाही तर अनेक विषयांवर सत्रे होतात, चर्चा होतात. थेट आर्य चाणक्यापासून ते आजच्या गुलजारपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर सत्रे झाली. ईशान्य भारत, भारताच्या सीमा व युद्धस्मारकांवरही सत्र झाले. बालदिनाला आपले शाळकरी वाचकही इथे बोलले. इथे कविता सादर झाल्या व कवितेचे व्याकरणही सादर झाले. शब्दांगणात हॅरी पॉटर व बोक्या सातबंडे एकत्र बागडले. इथे वाचक बोलले ,लेखक बोलले,अनुवादक  व प्रकाशकही व्यक्त झाले.कोरोनामुळे मार्च 2020 पासून कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध आले. शब्दांगणसाठी एकत्र जमण्यावर बंदी आली. पण शब्दांगण थांबले नाही. वाईटातून चांगले शोधून शब्दांगण 💻zoom meeting , fb live📱 व YouTube live📲 वर चालू झाले. स्थलकालाच्यामर्यादा संपल्या. आता अगदी आपल्या अंगणात बसूनही तुम्ही शब्दांगणात संचार करू शकता.
शब्दांगणात यायला वय, शिक्षण,व्यवसाय कसले कसलेच बंधन नाही. कसलेच शुल्क नाही. हवी फक्त वाचनाची भूक, साहित्याची ओढ. कोणीही रसिकाने यावं, इथल्या साहित्यसरितेत  बुडावं व दोन ओंजळी आपल्याही अर्पाव्यात!! 

शब्दांगणच्या सर्व सत्रांबद्दल माहिती देणारा आणि Youtube दुवे उपलब्ध करून देणारा हा ब्लॉग  रसिकवाचकांना नक्की आवडेल अशी आशा आहे.! 

सत्र २५० : साहित्य, शब्दांगण आणि आपण : सुरेश देशपांडे ( सांगता सत्र)

 १७।१२।२०२३

सत्र २५०वे: सांगता सत्र

विषय : साहित्य, शब्दांगण आणि आपण

सादरकर्ते : सुरेश देशपांडे



अभ्यागताला या! म्हणून स्वागत करणे हे अतिथी देवो भवच्या संस्कृतीला धरून आहे. पुलंनीच म्हटल्याप्रमाणे  "एका माणसाने दुसऱ्या माणसाला 'या' म्हणण्याइतके  अल्पाक्षरी तरीही बहुमूल्य वाक्य नसेल." पुढे जाऊन त्यांचेच दुसरे वचन आठवते "गप्प बैस! वा चुप बैस! किंवा बोलू नकोस! याच्याएवढे दुसरे भयंकर वाक्य कोणत्याही भाषेत नसेल."  कारण, भाषेचा जन्मच मुळी एका माणसाने दुसऱ्याला काहीतरी सांगण्यासाठी झालाय. हे वाक्य म्हटल्यावर संवादच खुंटला. वास्तविक पाहता, भाषा, तिच्यातले शब्द त्यांचे अर्थ(कधीकधी अनर्थही) त्यांच्या छटा, त्यातून तयार होणाऱ्या मानवी भावनांचे कल्लोळ व नवरसपूर्ण दर्शन हे सगळे केवळ नि केवळ एकाने दुसऱ्याला काही तरी सांगण्यासाठी आहे. बहुमूल्य भारतीय तत्त्वज्ञान गीता हीसुध्दा भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. एकाने सांगणे व दुसऱ्याने वा अनेकांनी ऐकणे हे आपल्याकडे  परंपरागत आहे. मौखिक ज्ञान,  संथा, एकपाठी, द्विपाठी हे सगळे त्याचीच पुढची परिवर्तित रूपे आहेत. आपल्याला भावलेले, आवडलेले, पटलेले ते दुसऱ्याला सांगावेसे वाटणे ही मूलभूत मानवी अंतःप्रेरणा आहे. मग ते एखादे आवडलेले चित्र, शिल्प, गाणे, चित्रपट, नाटक, अगदी एखादा वडापावसारखा स्ट्रीटफूडमधला खाद्यपदार्थही असेल. आवडलेले पुस्तक हाही यातलाच एक प्रकार. मला मुंबई दिनांक  वा बनगरवाडी वा फाइव्ह पाॕइंट समवन आवडली. की मग मी ती सगळ्या वाचनप्रेमी, पुस्तकातले किडे, ग्रंथपिपासू अश्यांना लगेच सांगतो. त्याचबरोबर माझी टीकाटिपण्णीही सांगतो. मला माहिती असते, ह्या टीकाटिपण्णीविना माझे विवेचन त्यांना मिळमिळीत वाटेल. 

ह्याच आणि अश्याच मानवी मूलभूत अंतःप्रेरणेचा आविष्कार, पुस्तक प्रेमी जनांचा मेळा, आधी प्रत्यक्ष व नंतर पॕनडेमिक काळात आभासी माध्यमातून,  तर बंधने शिथिल झाल्यावर प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमांद्वारे सर्वांंपर्यंत पोचणारा आपल्या सर्वांना सुपरिचित साहित्य विषयक कार्यक्रम शब्दांगण आता निरोप घेतोय. नव्हे विराम घेतोय. जरा 'विसावू या वळणावर' असे म्हणतोय.खरे तर, असे निरोपाचे काही बोलले की चुटपुटल्यासारखे होते. आता यापुढे, हा ५वर्षे सतत दर गुरुवारी चालू असलेला उपक्रम थांबणार ? हे ज्ञानहोत्र आता थंड होणार ? एका शब्दांगण प्रेमीच्या भाषेत ह्या मिठाईच्या दुकानाचे शटर खाली येणार का ?  अशी प्रश्नमालिका, असा भडिमार सर्व शब्दप्रेमींच्या,  समस्त शब्दांगण परिवाराच्या, आणि आयोजक टीमच्या तथा कार्यकर्त्यांच्या मनी दाटून आलाय. परंतु हे अटळ आहे. अपरिहार्य आहे. खरे तर, २५०वे सत्र ही समारंभपूर्वक साजरी करण्यासारखी जपून ठेवावी अशी उपलब्धी , आहे. त्याचबरोबर नवीन काही सुचून नव्या दमाने नव्या उमेदीने वेगळे काही करण्यासाठी सुयोग्य वेळही आहे. या वेळी गुरुवारऐवजी रविवारी आपल्या सर्वांसाठी शब्दांगण सत्र  आयोजिले आहे. एक रंजक व संस्मरणीय संध्याकाळ समानशीलाच्या वाचनप्रेमींसह घालवायला आवर्जून उपस्थित राहा. यावेळी शब्दांगणचे सत्र सादर करतायत एक उमद्या मनाचे म्हणून डोंबिवलीत सर्वांना सुपरिचित असलेले साहित्य प्रेमी व प्रकाशक श्री. सुरेश देशपांडे. त्यांचा विषय आहे  'साहित्य शब्दांगण आणि आपण.'

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २४९ : मनुस्मृति : विनोद देशपांडे

 ०७।१२।२०२३

सत्र २४९वे:

विषय : मनुस्मृति

सादरकर्ते : विनोद देशपांडे



सणांचा व उत्सवांचा देश अशीही एक ओळख असलेल्या आपल्या भारतात, ह्या सण उत्सवाला लगटूनच येणारा मुद्दा असतो पूर्वापार चाललेल्या परंपरा, चालीरीती, प्रथा, रिवाज..आदि इत्यादींचा ! .. आणि त्याहूनही कळीचा मुद्दा म्हणजे त्यांच्या ग्राह्यतेचा सत्यापनाचा. अलीकडे अश्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी गुगल हे उत्तर असते. त्याच्या सत्यापनात नको जायला. पण त्याआधी ह्या प्रश्नांची संशोधन वजा उकल प्रक्रिया 'शास्त्र असे सांगते', 'पंचांग',  ज्योतिषी, 'विवेकसिंधू', 'धर्मसिंधू' अश्या वेगवेगळ्या ज्ञानगंगांतून जात असे. आणि ह्यातील बहुतेकांची गंगोत्री असणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृति.जीवशास्त्र व मानववंशशास्त्र दृष्ट्या जरी मानवाची उत्क्रांती माकडापासून झालेली असली तरी मनुज/मनुष्य ह्या संज्ञांची व्युत्पत्ती आपल्याला पुन्हा  मनुपर्यंत नेते.  मनुपासून ज्यांची उत्पत्ती ते मनुज.हिंदुंच्या कुठल्याही धार्मिक कर्मकांडाच्या संकल्पात म्हटल्या जाणाऱ्या श्रुतीस्मृतीपुराणोक्त मधील स्मृती म्हणजे अनेक ऋषिमुनींनी   त्यांच्या स्मरणानुसार सांगितलेले,  लिखित अथवा पठित अथवा संथा देऊन घोटवलेले विविध मंत्र अथवा स्तोत्र अथवा सूक्त. ह्या श्रुतीस्मृतीपुराणोक्त मधील स्मृती जरी एकट्या मनुची नसली तरी त्या असंख्य स्मृतींपैकी एक मनुने सांगितलेली मनुस्मृती तर खचितच असते.एवंच, मनुस्मृतिवाचून (शिवाय) कार्य सिध्दीस जात नाही. म्हणून ती वाचूनच (वाचन करून) शहाण्या पुरुषाने पुढे जावे. शहाणा पुरुष म्हणजे जो  धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाचे महत्त्व  जाणतो. चतुर्विध पुरुषार्थ, चातुर्वर्ण्य व्यवस्था, चार आश्रम ह्या साऱ्यांची रीतसर व यथायोग्य मांडणी व या प्रत्येक व्यवस्थेतील तसेच अवस्थेतील व्यक्तीचे कर्तव्य आजच्या भाषेत सांगायचे तर Do's and don'ts ह्याचे मनुस्मृतित साद्यंत विवेचन आहे.  समाजकारण, राज्यकारण, धर्मकारण, नीतिशास्त्र अश्या चहू अंगांनी मानवी जीवनाला किंवा मनुष्य जीवनाला स्पर्शणारी मनुस्मृति. ज्यावर नेहमीच मतमतांतरे होत राहिली. राहतात व राहतीलही. राजस्थानच्या न्यायपालिकेच्या आवारातील मनुचा पुतळा  वादग्रस्त ठरू लागल्यावर  तो तसाच ठेवण्याचा निर्णय झाला. याबाबत विभूतीभूषण शर्मा  ह्या एका काँग्रेस नेत्याची टिपण्णी फारच उद्बोधक होती. "उच्च न्यायालयात मनूचा पुतळा बसवण्यात आला तेव्हा तो कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नव्हता. मनू हा लेखी कायदा आणणारा पहिला माणूस मानला जातो. त्या कायद्यात काही तोटा असेल तर तो आपल्या संविधानात केल्याप्रमाणे दुरुस्त्या करण्यास खुला आहे. पुतळ्याचा कोणत्याही जातीशी संबंध नसावा." अश्या मनुविषयी त्याच्या मनुस्मृति विषयी जाणून घ्यायला -ऐकायला उद्या गुरुवार दि. ७ डिसेंबरला शब्दांगणच्या  सत्राला जरूर या. हे सत्र सादर करताहेत आपल्या सर्वांना बहुश्रुत व योग्यभाषी म्हणून चिरपरिचित असणारे ध्रुवचेच विनोद देशपांडे !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४८ : महाभारताचे स्थूल दर्शन : शौनक पिंपुटकर

 ३०।११।२०२३

सत्र २४८वे:

विषय : महाभारताचे स्थूल दर्शन

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर



भारतीय संस्कृतीच्या व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला, संशोधकाला वेद-उपनिषदे जितकी आकर्षितात तितकीच अथवा काही अंशी जास्त रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये. ही दोन्ही पुराणे वाङमय आहेत, की ऐतिहासिक दस्तऐवज यावर अभ्यासूंची वा संशोधकांची मतमतांतरे असली तरीही, भारतीय संस्कृतीच्या व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला हे दोन्ही अभ्यासूनच पुढे जावे लागते.कुरुक्षेत्रावर अठरा अक्षौहिणी सैन्य व तद्नंतर दुर्योधन धारातीर्थी पडल्यानंतर रूढार्थाने महाभारताचा शेवट होतो. परंतु, त्या महाभारतात त्याखेरीजही बरेच काही घडते. कारण, महाभारत म्हणजे नुसतीच युध्दाची कथा नाही. तर ..रणक्षेत्री आपल्याच "काका-मामादि आप्तांविरुध्द शस्र कसे उचलू?" म्हणणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेसारखे तत्त्वज्ञान यात येते. युध्दानंतर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडून पांडवांनी घेतलेले ज्ञान व धार्मिक धडे शिकायला मिळतात.राजाची कर्तव्ये, राज्य कसे चालवावे हे शिकवणारी विदुरनीती  असेल अथवा युध्दनीती वा वेळोवेळी वापरलेली कूटनीती हेही याच महाभारतात समजून घ्यायला मिळते. अश्या प्रकारच्या एक-दोन नाही तर अनेकविध शास्त्रांची, ज्ञानशाखांची ठेव असलेले महाभारत. उगाच का, व्यासांनी अस्पृष्ट काही ठेवलेच नाही अशा अर्थी  -व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं- म्हटले जाते..! खरोखरच,  महाभारत हे एक ज्ञानाचा खजिना आहे. ह्या खजिन्याची माहिती आपल्यासमोर  या गुरुवारी मांडतोय आपल्यातलाच एक चौफेर व सखोल वाचन करणारा तरुण वाचक. वयाने तरुण असला तरी ज्याने वर्षाकाठी वाचलेल्या पुस्तकांची संख्या पन्नाशी ओलांडते असा  शौनक पिंपुटकर.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४७ : रुळानुबंध : गणेश मनोहर कुलकर्णी (मुलाखतकार - माधव जोशी)

 २३।११।२०२३

सत्र २४७वे:

पुस्तक : रुळानुबंध (प्रकट मुलाखत)

लेखक व सादरकर्ते : गणेश मनोहर कुलकर्णी

मुलाखतकार : माधव जोशी



आजचं शब्दांगण अतिशय खास. रुळानुबंध या पुस्तकाचे लेखक गणेश कुलकर्णी  चोखंदळ वाचक... पण ते भाषेच्या, पुस्तकाच्या प्रेमातच पडतात....   पुस्तकं वाचताना त्याची कोरडी समीक्षा करत नाहीत. ते वाचताना सुखावतात, दुखावतात! लेखकाच्या कौशल्याने भारावून जातात. हरखून जातात.  असा हा हरहुन्नरी वाचक लेखक म्हणून आपल्यासमोर येतो ते हेच वेगळेपण घेऊन. डॉ. प्रल्हाद देशपांडे यांच्या अभिप्रायाचा पुनरुच्चार करून सांगायचे झाले तर  'रुळानुबंध' ही नुसती एका रेल्वे इंजिन चालकाची अनुभवमालिका नाही , तर आपण एका चतुरंगी व्यक्तीमत्वाचं बोलणं ऐकतो आहोत , वाचतो आहोत. ' रुळानुबंध ' वाचणं म्हणजे पोलादी दैनंदिनीआड दडलेला एक मनोरम पुष्पगुच्छ उलगडत जाणं. या प्रक्रियेत आपण गणेश कुलकर्णी या रसिक अवलियाला भेटता भेटता स्वतःतल्या लेखकालाही नकळत भेटतो. आज गणेश कुलकर्णीची मुलाखत घेत आहेत स्वतः माधव जोशी. संवेदनशील रुजु व्यक्तिमत्व, तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वर्तुळात सहजपणे रमणारं आणि कॉर्पोरेट सह  सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वातही अत्यंत सहजपणे सामावून गेलेलं व्यक्तिमत्व माधव जोशी आज कवी मनाच्या गणेश कुलकर्णींची मुलाखत घेतायंत... नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४६ : शीख इतिहास : चैतन्य जोशी

१६।११।२०२३

सत्र २४६वे:

विषय : शीख इतिहास

सादरकर्ते : चैतन्य जोशी



शीख म्हटले की तत्काळ ओठावर येणारा  उद्गार असतो म्हणजे सरदार / सरदारजी.. ? त्यानंतर ओठावर एक अस्फुट हसूही येतं. सरदार हे पराक्रम, शौर्य, धैर्य, वीरता, निधडेपणा, दिलेरीचं प्रतीक तर सरदारजी म्हणजे विनोद करण्याचं लक्ष्यस्थान. खरे तर सरदार हे भारतात शूरांनाच म्हणतात. हे जितके अभिमानाने ह्या शिखांनी मिरवले  तितकेच आपल्याला विनोदाचा केंद्रबिंदू केलं जाणेही खिलाडूपणे स्वीकारले, अगदी अनेक वर्षे. खुद्द खुशवंतसिंग यांच्या जोक बुक्समध्येही थोड्या फार प्रमाणात हे दिसतं.

मग एक वेगळाच आयाम जुळतो शिखांभोवती खलिस्तानचा. मग आठवतात, मुंबईत एके काळी मक्तेदारी असलेले शिखांचे टॕक्सी, गॕरेज असे काही व्यवसाय. ह्या त्यांच्या मुंबईतल्या अस्तित्वाला कोणे एके काळी ग्रहण लागेलसे वाटण्याचाही एक काळ..एक ना अनेक. सर्वसामान्यपणे, आपल्याला हे इतके नि एवढेच माहिती असते. त्या पलीकडे थोडेफार म्हणजे त्यांचे धर्मगुरु गुरु नानकसाहेब ते  गोविंदसिंह  !आणि अर्थातच काही शीख व्यक्ती ! देशाचे सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ, राष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य अनेकानेक सर्वोच्च पदी होऊन गेलेले व आजही अनेक पदे म्हणजे अगदी मुंबईचे महापौर पदही भूषविणारे  शीख बांधव. किंवा नुकतेच  निधन झालेला बिशनसिंह बेदी !पण शीख म्हणजे याहून आणखी काही आहे का? त्यांना हा पराक्रम शौर्य  असा वारसा कोणी दिला? मराठा मावळ्यांची शूरवीर, पराक्रमी, निधडे म्हणून सर्वदूर दहशत बसलेली  होती तशीच काहीशी ओळख असलेले शीख.ह्याचा उगम काही आहे का? असल्यास काय ? कुठे ? ह्याची जिज्ञासा शमवायची असेल  तर, यावेळच्या शब्दांगणला जरूर हजेरी लावा. या आधीही  इतिहासाविषयीचा चौफेर वाचक असल्याची आपली ओळख नोंदवलेला चैतन्य सादर करतोय शिखांचा इतिहास ! गुरु नानक जयंतीच्या  पार्श्वभूमीवर शिखांचा इतिहास कथन करणार आहे, सखोल अभ्यासून विषय मांडणारा चैतन्य जोशी.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...