Wednesday, December 8, 2021

सत्र ३ - नमिता जाधव - छावा

२०/१२/२०१८ 

सत्र ३- नमिता जाधव 

पुस्तक- छावा 

लेखक- शिवाजी सावंत 


श्री. शंभो शिवजातस्य मुद्रा धौरिव राजते |

यदंक सेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||


अर्थात- शिवपुत्र शंभूराजाची ही तेजस्वी राजमुद्रा शोभून दिसते आहे. राजअंकित अशा या मुद्रेची अधिकारसत्ता कोणावर चालत नाही ? 

आपल्या अद्वितीय पराक्रमाने संभाजीराजांनी मराठी साम्राज्य नुसतेच रक्षिले नाही तर ते वाढवले सुद्धा. त्यांच्या एकूण नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पोर्तुगीजांचे तीन-चतुर्थांश राज्य जिंकून ते स्वतःच्या प्रदेशाला जोडले होते. कर्नाटकातील राज्य दुप्पट केले. हे सर्व पाहता राजमुद्रेतील शब्द खऱ्या अर्थाने पटतात. 

अशा या सिंहाच्या छाव्याची कथा शिवाजी सावंत वाचकांसमोर मांडतात. एकूणच मराठ्यांच्या इतिहासात जशी शिवाजी महाराजांबद्दल व त्यांच्या चरित्राबद्दल एकवाक्यता आढळते तशी संभाजी महाराजांबद्दल आढळत नाही. बखर साहित्यात त्यांचे वर्णन लहरी, शीघ्रकोपी असे आढळते, तर इंग्रज आणि  फ्रेंच रिपोर्ट मध्ये मात्र दीर्घसुश्री, धीमा, सावध ही विशेषणे आढळतात. यामुळेच संभाजी महाराजांचे चरित्र रेखाटणे हे आव्हान होते जे शिवाजी सावंत यांनी समर्थपणे पेललेले दिसते. 

संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. त्यानंतर दोनच वर्षांचे असताना त्यांना मातृवियोग सहन करावा लागला. अवघ्या आठ-नऊ वर्षांचे असताना त्यांना मिर्झा राजेंच्या तालात ओलीस म्हणून राहावे लागले. त्यानंतर मथुरेत सुद्धा एकटेच राहावे लागले. घरातील अंतर्गत राजकारणाला सुद्धा तोंड द्यावे लागले. 

सत्तेवर आल्यावर एकाच वेळी पाच आघाड्यांवर हा छावा झुंजत होता. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईचे इंग्रज आणि तीस लाखांची फौज व १४ कोटींचा खजिना घेऊन दक्षिणेत उतरलेला औरंगजेब या चार आघाड्या तर पाचवी आघाडी म्हणजे स्वार्थी स्वकीय ! 

१६८५ पर्यंत दक्षिणेत येऊन औरंगजेबाला काहीच यश मिळाले नाही. उलटपक्षी मराठ्यांच्या मुलुखातून फौजा मागे घेऊन त्या विजापूर आणि गोवळकोंड्याच्या दिशेने वळवाव्या लागल्या यावरून संभाजी राजांचे कुशल सेनानी नेतृत्त्व दिसून येते. त्यांच्या कुशल सेनानी नेतृत्त्वाचा आणखी एक नमुना म्हणजे त्यांची जंजि-यावरची चाल. लंडन दरबार मध्ये याचा उल्लेख warlike prince असा करतो. 

संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांचे वीरमरण! त्यांनी धर्मासाठी स्वीकारलेले वीर मरण त्यानंतर शेकडो वर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. किंबहुना त्यामुळेच जो औरंगजेब जिहाद पुकारून संपूर्ण दक्खन हिरवी करण्यासाठी दक्षिणेत आला, त्याला त्याचा अंत दक्षिणेत आला तरी मराठी साम्राज्य बुडवता आले नाही. 

या कादंबरीच्या योगाने एक महत्त्वाची शिकवण सर्वांनाच या चरित्रातून मिळते. लढाईत हार जितीला मोल नसते, मोल असते ते झगडण्याला ! निकराने प्राणपणाने शर्थीने झुंजण्याला ! 

संभाजी महाराजांच्या या झुंजार व्यक्तित्वाचा वेध घेणारी छावा ही कादंबरी नमिता जाधव यांनी मांडली आहे. 
  

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...