११।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर २० श्रावण १९४६
सत्र २६२वे:
विषय : अहिल्याबाई - लोकोत्तर प्रशासक
सादरकर्त्या : डॉ. प्राची दामले
स्त्री-मुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचा विविध कार्यक्षेत्रात प्रवेश वा बंदी, त्यांच्या वैयक्तिक समस्या, तसेच त्यांची सुरक्षा हे व याहून अधिक असे अनेकविध विषय नेहमी चर्चेत असतात. सध्या तर काय, स्त्री असणारी पुरुष व्यक्ती की पुरुष असणारी स्त्री असे वेगळ्याच आयामाचे प्रश्नही ऐरणीवर आहेत. ज्या बांग्लादेशातील अराजकसदृश परिस्थिती हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे त्या देशाच्या निर्मात्या म्हणून ज्यांचे नाव अग्रभागी असते त्याही एक स्त्रीच. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी तेव्हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली. त्यांच्याविषयी देशात व विदेशातही आदराने व कौतुकाने बोलताना त्यांचे स्री असणेही तेव्हाच्या चर्चेचा मुद्दा झालेला.अर्थात, तेव्हाही जगात राष्ट्रप्रमुखपदी असणाऱ्या स्त्रियांची संख्या जेमतेमच होती. या पार्श्वभूमीवर, भारतीय इतिहासात नजर टाकल्यास, ही अशी रणरगिणी व लोकोत्तर स्त्रियांची परंपरा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत दिसते, जी आजही चालूच आहे. मग त्या बाल शिवाजीला प्रशिक्षण देणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब असतील की पेशवेपदासाठी कारस्थान करणाऱ्या आनंदीबाई असतील. अगदी पेशवाईत मध्यभारत व उत्तर भारतातील आपल्या अंमलाखालील प्रदेशात अनेक समाजोपयोगी कामे करून वेळप्रसंगी रणांगणावर तलवार गाजवणाऱ्या अहिल्याबाई होळकर असतील. लढायला जाणाऱ्या सैनिकांमुळे शेतातील पिकांची नासाडी होऊ नये म्हणून पेशव्यांनाच अडवणाऱ्या मल्हाररावांच्या सुनेने वेळप्रसंगी शस्त्रधारी, हीदेखील आपली ओळख जगाला करून दिली. जमलेला महसूल हा रयतेच्या कामी आणावा, जनहितातून परमार्थ साधावा हीच त्यांची त्यामागची भावना. त्यांनी निःस्पृहपणे उभी केलेली विविध समाजोपयोगी कामे आजही साक्षीला आहेत. त्यांच्या समाजोपयोगी कार्याच्या खाणाखुणा आजही दिसतात, काही ठिकाणी सुदृढपणे तर काही ठिकाणी अवशेषरुपात, देवस्थानांमधून, नदीकाठच्या घाटांमधून. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, रविवार ११ ऑगस्ट सायंकाळी ६:३०वा. शब्दांगणच्या सत्राचा विषय आहे अहिल्याबाई होळकर,सादर करतायत डॉ. प्राची दामले. शब्दांगणमध्ये याही आधी त्यांच्या अभ्यासपूर्ण व व्यासंगाने समृद्ध सादरीकरणाचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाय. त्यामुळे नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment