१२।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर २२ वैशाख १९४६
सत्र २५६वे:
विषय : खर्या मौनाची भाषांतरे
सादरकर्त्या : श्रीमती सायली टिळक
आटपाट नगर होतं, त्या नगरात एक छोटं पण सुखी कुटुंब राहत होतं. बाबा,आई आणि मुलगा असं हे त्रिकोणी कुटुंब! सर्व काही छान चालू होतं, मात्र या सर्व सुखाला एकच कारुण्याची किनार होती. आई-बाबांना अजिबात ऐकू येत नसे. कर्णबधिर हा शब्द कळायच्यासुद्धा आधी मुलाला आपल्या आईवडिलांबरोबर जुळवून घ्यावं लागे. दोघे आईवडील जन्मतःच कर्णबधिर असल्यामुळे त्याचा बोलण्यावर पण आपसूकच परिणाम झाला होता. मुलगा मात्र शारिरीक दृष्ट्या संपूर्ण निरोगी होता. लहानपणापासून आपल्याला काय हवंय हे आई-वडिलांपर्यंत पोचवायचं कसं हाच त्याला प्रश्न पडायचा. पण आईवडील हुशार आणि समंजस होते, त्या दोघांचं सहजीवन हे कदाचित एखाद्या शारिरीक दृष्ट्या सुदृढ जोडप्याला लाजवेल असं होतं. नात्यांमधला संवाद दोघांनी छान जपला होता. हेच संस्कार मुलावर झाले तर नवल नाही, मुलाला देखील आपल्या आईवडिलांच्या व्यंगाचा न्यूनगंड वाटत नसे. घरीच काय, पण बाहेर फिरताना देखील तो त्यांना छान सांभाळून घेत सगळीकडे अभिमानाने हे माझे आई-बाबा अशी ओळख करून देत असे. शाळेतल्या मित्रांना देखील तो आणि त्याचे आई-बाबा घरी बोलावून त्यांचा प्रेमाने पाहुणचार करायचे. आपल्या व्यंगत्वाने आयुष्यातील रंग उडून न जाता त्यात उत्साहाचे, प्रेमाचे आणि संवादाचे रंग भरणारं हे कुटुंब खरोखर विलक्षण!
अशी अनेक कुटुंबं किंवा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात, काही शारिरीक व्यंगामुळे एका कोपर्यात गेलेली, पण जगण्याची उमेद कायम जिवंत ठेवणारी! व्यक्ती म्हणून आपण सहसा त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहतो, पण त्यांना सहानुभूती नाही, आपुलकी हवी असते. त्यांच्या जगाबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते आणि या दोन जगामधील सीमारेषा पुसण्याचा देखील सहसा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. पण हे काम करणारे काही सहृदयी लोक असतात, त्यांपैकी एक म्हणजे आपल्या शब्दांगण परिवाराच्या सदस्या सायली टिळक! आणि या शब्दांगणच्या २५६व्या सत्रात त्या आपल्याशी याच अनुभवांवर बोलणार आहेत, खर्या मौनाची भाषांतरे या विषयावर ! सायली टिळकांचं सत्र म्हणजे अनोखे अनुभव आणि लालित्यपूर्ण संवाद हे समीकरण त्यांच्या विजया मेहतांवरच्या सत्रामधून आपल्या परिचयाचं झालं आहेच. या सत्रात त्या दिव्यांगांच्या क्षेत्रातील काम करतानाच्या स्वानुभवांवर बोलणार आहेत, त्यामुळे एक रंजक आणि आपुलकीचं विश्व आपल्यासमोर उलगडेल यात शंका नाही.आपल्या संस्कृतीतील भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । हा मंत्र खरोखर जगणार्या कर्णबधिर दिव्यांगांच्या विश्वात डोकावण्याची ही संधी अजिबात चुकवू नका.
नक्की या !!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment