०१।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर ११ वैशाख १९४६
सत्र २५५वे:
विषय : काश्मीर
सादरकर्ते : श्री. चन्द्रशेखर टिळक
आपल्या भारत देशाचा नकाशा पाहिला तर त्यात भारतमातेच्या मुकुटाप्रमाणे शोभणारे राज्य म्हणजे काश्मीर! अवर्णनीय अशा निसर्ग सौंदर्याबरोबरच या काश्मीर राज्याने एके काळी अनुपम बुद्धीसौंदर्यही अनुभवले आहे. प्राचीन काश्मीरचा इतिहास लिहिताना कवी कल्हणाने राज तरंगिणी या ग्रंथात म्हटले आहे, विद्यावेश्मनि तुङ्गानि कुङ्कुमं सहितं पयः । द्राक्षेति यत्र सामान्यम् अस्ति त्रिदिवदुर्लभम् ।। अर्थात् स्वर्गातही दुर्मिळ अशी विद्याभवने, कुंकुम, हिमजल, द्राक्षादि पेये जिथे अगदी सहज मिळतात असा प्रदेश म्हणजे काश्मीर ! पण दुर्दैवाने एकेकाळच्या या भारताच्या नंदनवनाला आज मात्र दहशतवाद आणि इतर अनेक समस्यांनी घेरले आहे.अशा परिस्थितीत कलम ३७०, काश्मीर फाईल्स, काश्मीरी दहशतवाद इ. मुद्दे प्रसार माध्यमांमध्ये मीठ- मसाला लावून चर्चेत असताना संवेदनशीलपणे या मुद्द्यांवर आणि एकंदरच काश्मिरच्या संस्कृतीवर भाष्य करणारे एक पुस्तक म्हणजे श्री. चन्द्रशेखर टिळक लिखित, मोरया प्रकाशनाचे ' काश्मीर ' हे पुस्तक होय. या पुस्तकावर बोलण्यासाठी स्वतः टिळक सर शब्दांगण मध्ये येत आहेत. तसंच यावेळी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन ॲड. सौ. वृंदा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते होणार आहे. श्री. चन्द्रशेखर टिळक यांचे सत्र, मग ते अर्थ विषयावर असो वा अगदी गजानन विजय सारख्या विषयावरील ललित मांडणीचे असो.. शब्दांगणच्या श्रोत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. येत्या सत्रात श्री. चन्द्रशेखर टिळक स्वतः आपल्या पुस्तकावर अर्थात काश्मीर बद्दल बोलणार आहेत. मागे २०० व्या सत्रात त्यांनी बदलता भारत या विषयावर बोलताना काश्मीर खोऱ्यातील अनुभवांवर केलेलं भाष्य आपल्यापैकी अनेकांना आठवत असेलच. अशाच अनुभवांवर बोलण्यासाठी, काश्मीर विषयक भावनिक- सांस्कृतिक - सामाजिक अंगाने केलेला अभ्यास मांडण्यासाठी टिळक सर पुढचं सत्र घेणार आहेत. स्वतः लेखकाने आपल्या पुस्तकावर सत्र घेणं हा शब्दांगणसाठी नेहमीच दुग्धशर्करा योग असतो. या सत्रातही शुष्क पुस्तकी अभ्यासापलीकडे जाणारं टिळक सरांचं संवेदनशील चिंतन ऐकण्यासाठी नक्की या.
या सत्राचा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे वक्त्यांच्या विनंतीवरून या सत्राचे ध्वनिमुद्रण आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व !

No comments:
Post a Comment