१४।०७।२०२४ - राष्ट्रीय सौर २३ आषाढ १९४६
सत्र २६०वे:
विषय : लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप
सादरकर्ते : श्री. विवेक भगत
भारत देशाचे वर्णन करताना हमखास वापरले जाणारे एक वाक्य म्हणजे विविधतेत एकता! ही विविधता आपल्याला भारतीयांच्या देवतांमध्ये आणि मंदिरांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. तेहतीस कोटी देवांच्या गणनेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतीलही पण गल्लोगल्ली, पारापारांवर, घरोघरी आणि सर्व भारतभरच असंख्य मंदिरे भाविकांच्या भक्तीचे केंद्र ठरतात. खरं पाहता देवासमोर उभं राहिलं की डोळे आपसूक मिटतात आणि मन आतमध्ये डोकावून पाहू लागतं पण मनाची ही शांतता अनुभवण्याबरोबरच जर डोळसपणे देवतेच्या मूर्तीकडे किंवा मंदिराच्या रचनेकडे पाहिलं तर तीसुद्धा मूकपणे आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते. कधी मंदिरांच्या खांबांवर, भिंतींवर कोरलेल्या पौराणिक कथा, रुपकं आपलं मन आकर्षून घेतात तर कधी तिथलं स्थापत्य आपल्याला अचंबित करतं.कोणार्कचे सूर्यमंदिर, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर किंवा आपल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर अशी कित्येक मंदिरे स्थापत्यशैलीच्या दृष्टीने वैशिष्टयपूर्ण ठरतात. भारतामध्ये तर स्थापत्यकलेच्या विविध शैली मंदिरांच्या अनुषंगाने विकसित झाल्या आहेत. प्रत्येक प्रदेशाच्या मंदिरांची एक विशेष ओळख बनत गेली. एकूणच काय तर भारतातील मंदिरे ही जशी सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रबोधनाची केंद्र होती, आहेत, तशीच ती शिल्पकलेच्या, स्थापत्याच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वाची ठरली आहेत. पण या मंदिरांच्या रचनेकडे नेमकं पाहायचं कसं? मंदिराकडे डोळसपणे बघायचं कसं ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. गेली अनेक वर्ष यासंबंधी मार्गदर्शन करणारे श्री. विवेक भगत येत्या शब्दांगण सत्रात यासंबंधीच एक विषय मांडणार आहेत. लोकसंस्कृतीतील देवळांचे स्वरूप याविषयावर ते आपल्याशी बोलणार आहेत. आजवर इतिहास तसेच भारतीय शिल्पकला, स्थापत्य इ. विषयांवर विवेकजींनी केलेले लेखन आपण विविध माध्यमांतून वाचले असेल. येत्या रविवारी प्रत्यक्ष त्यांच्याकडून या विषयावरील मार्गदर्शन मिळवण्यासाठी नक्की या !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment