३०।११।२०२३
सत्र २४८वे:
विषय : महाभारताचे स्थूल दर्शन
सादरकर्ते : शौनक पिंपुटकर
भारतीय संस्कृतीच्या व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला, संशोधकाला वेद-उपनिषदे जितकी आकर्षितात तितकीच अथवा काही अंशी जास्त रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये. ही दोन्ही पुराणे वाङमय आहेत, की ऐतिहासिक दस्तऐवज यावर अभ्यासूंची वा संशोधकांची मतमतांतरे असली तरीही, भारतीय संस्कृतीच्या व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला हे दोन्ही अभ्यासूनच पुढे जावे लागते.कुरुक्षेत्रावर अठरा अक्षौहिणी सैन्य व तद्नंतर दुर्योधन धारातीर्थी पडल्यानंतर रूढार्थाने महाभारताचा शेवट होतो. परंतु, त्या महाभारतात त्याखेरीजही बरेच काही घडते. कारण, महाभारत म्हणजे नुसतीच युध्दाची कथा नाही. तर ..रणक्षेत्री आपल्याच "काका-मामादि आप्तांविरुध्द शस्र कसे उचलू?" म्हणणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेसारखे तत्त्वज्ञान यात येते. युध्दानंतर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडून पांडवांनी घेतलेले ज्ञान व धार्मिक धडे शिकायला मिळतात.राजाची कर्तव्ये, राज्य कसे चालवावे हे शिकवणारी विदुरनीती असेल अथवा युध्दनीती वा वेळोवेळी वापरलेली कूटनीती हेही याच महाभारतात समजून घ्यायला मिळते. अश्या प्रकारच्या एक-दोन नाही तर अनेकविध शास्त्रांची, ज्ञानशाखांची ठेव असलेले महाभारत. उगाच का, व्यासांनी अस्पृष्ट काही ठेवलेच नाही अशा अर्थी -व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं- म्हटले जाते..! खरोखरच, महाभारत हे एक ज्ञानाचा खजिना आहे. ह्या खजिन्याची माहिती आपल्यासमोर या गुरुवारी मांडतोय आपल्यातलाच एक चौफेर व सखोल वाचन करणारा तरुण वाचक. वयाने तरुण असला तरी ज्याने वर्षाकाठी वाचलेल्या पुस्तकांची संख्या पन्नाशी ओलांडते असा शौनक पिंपुटकर.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment