Saturday, January 13, 2024

सत्र २५० : साहित्य, शब्दांगण आणि आपण : सुरेश देशपांडे ( सांगता सत्र)

 १७।१२।२०२३

सत्र २५०वे: सांगता सत्र

विषय : साहित्य, शब्दांगण आणि आपण

सादरकर्ते : सुरेश देशपांडे



अभ्यागताला या! म्हणून स्वागत करणे हे अतिथी देवो भवच्या संस्कृतीला धरून आहे. पुलंनीच म्हटल्याप्रमाणे  "एका माणसाने दुसऱ्या माणसाला 'या' म्हणण्याइतके  अल्पाक्षरी तरीही बहुमूल्य वाक्य नसेल." पुढे जाऊन त्यांचेच दुसरे वचन आठवते "गप्प बैस! वा चुप बैस! किंवा बोलू नकोस! याच्याएवढे दुसरे भयंकर वाक्य कोणत्याही भाषेत नसेल."  कारण, भाषेचा जन्मच मुळी एका माणसाने दुसऱ्याला काहीतरी सांगण्यासाठी झालाय. हे वाक्य म्हटल्यावर संवादच खुंटला. वास्तविक पाहता, भाषा, तिच्यातले शब्द त्यांचे अर्थ(कधीकधी अनर्थही) त्यांच्या छटा, त्यातून तयार होणाऱ्या मानवी भावनांचे कल्लोळ व नवरसपूर्ण दर्शन हे सगळे केवळ नि केवळ एकाने दुसऱ्याला काही तरी सांगण्यासाठी आहे. बहुमूल्य भारतीय तत्त्वज्ञान गीता हीसुध्दा भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. एकाने सांगणे व दुसऱ्याने वा अनेकांनी ऐकणे हे आपल्याकडे  परंपरागत आहे. मौखिक ज्ञान,  संथा, एकपाठी, द्विपाठी हे सगळे त्याचीच पुढची परिवर्तित रूपे आहेत. आपल्याला भावलेले, आवडलेले, पटलेले ते दुसऱ्याला सांगावेसे वाटणे ही मूलभूत मानवी अंतःप्रेरणा आहे. मग ते एखादे आवडलेले चित्र, शिल्प, गाणे, चित्रपट, नाटक, अगदी एखादा वडापावसारखा स्ट्रीटफूडमधला खाद्यपदार्थही असेल. आवडलेले पुस्तक हाही यातलाच एक प्रकार. मला मुंबई दिनांक  वा बनगरवाडी वा फाइव्ह पाॕइंट समवन आवडली. की मग मी ती सगळ्या वाचनप्रेमी, पुस्तकातले किडे, ग्रंथपिपासू अश्यांना लगेच सांगतो. त्याचबरोबर माझी टीकाटिपण्णीही सांगतो. मला माहिती असते, ह्या टीकाटिपण्णीविना माझे विवेचन त्यांना मिळमिळीत वाटेल. 

ह्याच आणि अश्याच मानवी मूलभूत अंतःप्रेरणेचा आविष्कार, पुस्तक प्रेमी जनांचा मेळा, आधी प्रत्यक्ष व नंतर पॕनडेमिक काळात आभासी माध्यमातून,  तर बंधने शिथिल झाल्यावर प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमांद्वारे सर्वांंपर्यंत पोचणारा आपल्या सर्वांना सुपरिचित साहित्य विषयक कार्यक्रम शब्दांगण आता निरोप घेतोय. नव्हे विराम घेतोय. जरा 'विसावू या वळणावर' असे म्हणतोय.खरे तर, असे निरोपाचे काही बोलले की चुटपुटल्यासारखे होते. आता यापुढे, हा ५वर्षे सतत दर गुरुवारी चालू असलेला उपक्रम थांबणार ? हे ज्ञानहोत्र आता थंड होणार ? एका शब्दांगण प्रेमीच्या भाषेत ह्या मिठाईच्या दुकानाचे शटर खाली येणार का ?  अशी प्रश्नमालिका, असा भडिमार सर्व शब्दप्रेमींच्या,  समस्त शब्दांगण परिवाराच्या, आणि आयोजक टीमच्या तथा कार्यकर्त्यांच्या मनी दाटून आलाय. परंतु हे अटळ आहे. अपरिहार्य आहे. खरे तर, २५०वे सत्र ही समारंभपूर्वक साजरी करण्यासारखी जपून ठेवावी अशी उपलब्धी , आहे. त्याचबरोबर नवीन काही सुचून नव्या दमाने नव्या उमेदीने वेगळे काही करण्यासाठी सुयोग्य वेळही आहे. या वेळी गुरुवारऐवजी रविवारी आपल्या सर्वांसाठी शब्दांगण सत्र  आयोजिले आहे. एक रंजक व संस्मरणीय संध्याकाळ समानशीलाच्या वाचनप्रेमींसह घालवायला आवर्जून उपस्थित राहा. यावेळी शब्दांगणचे सत्र सादर करतायत एक उमद्या मनाचे म्हणून डोंबिवलीत सर्वांना सुपरिचित असलेले साहित्य प्रेमी व प्रकाशक श्री. सुरेश देशपांडे. त्यांचा विषय आहे  'साहित्य शब्दांगण आणि आपण.'

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...