१६।११।२०२३
सत्र २४६वे:
विषय : शीख इतिहास
सादरकर्ते : चैतन्य जोशी
शीख म्हटले की तत्काळ ओठावर येणारा उद्गार असतो म्हणजे सरदार / सरदारजी.. ? त्यानंतर ओठावर एक अस्फुट हसूही येतं. सरदार हे पराक्रम, शौर्य, धैर्य, वीरता, निधडेपणा, दिलेरीचं प्रतीक तर सरदारजी म्हणजे विनोद करण्याचं लक्ष्यस्थान. खरे तर सरदार हे भारतात शूरांनाच म्हणतात. हे जितके अभिमानाने ह्या शिखांनी मिरवले तितकेच आपल्याला विनोदाचा केंद्रबिंदू केलं जाणेही खिलाडूपणे स्वीकारले, अगदी अनेक वर्षे. खुद्द खुशवंतसिंग यांच्या जोक बुक्समध्येही थोड्या फार प्रमाणात हे दिसतं.
मग एक वेगळाच आयाम जुळतो शिखांभोवती खलिस्तानचा. मग आठवतात, मुंबईत एके काळी मक्तेदारी असलेले शिखांचे टॕक्सी, गॕरेज असे काही व्यवसाय. ह्या त्यांच्या मुंबईतल्या अस्तित्वाला कोणे एके काळी ग्रहण लागेलसे वाटण्याचाही एक काळ..एक ना अनेक. सर्वसामान्यपणे, आपल्याला हे इतके नि एवढेच माहिती असते. त्या पलीकडे थोडेफार म्हणजे त्यांचे धर्मगुरु गुरु नानकसाहेब ते गोविंदसिंह !आणि अर्थातच काही शीख व्यक्ती ! देशाचे सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ, राष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य अनेकानेक सर्वोच्च पदी होऊन गेलेले व आजही अनेक पदे म्हणजे अगदी मुंबईचे महापौर पदही भूषविणारे शीख बांधव. किंवा नुकतेच निधन झालेला बिशनसिंह बेदी !पण शीख म्हणजे याहून आणखी काही आहे का? त्यांना हा पराक्रम शौर्य असा वारसा कोणी दिला? मराठा मावळ्यांची शूरवीर, पराक्रमी, निधडे म्हणून सर्वदूर दहशत बसलेली होती तशीच काहीशी ओळख असलेले शीख.ह्याचा उगम काही आहे का? असल्यास काय ? कुठे ? ह्याची जिज्ञासा शमवायची असेल तर, यावेळच्या शब्दांगणला जरूर हजेरी लावा. या आधीही इतिहासाविषयीचा चौफेर वाचक असल्याची आपली ओळख नोंदवलेला चैतन्य सादर करतोय शिखांचा इतिहास ! गुरु नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिखांचा इतिहास कथन करणार आहे, सखोल अभ्यासून विषय मांडणारा चैतन्य जोशी.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment