०७।१२।२०२३
सत्र २४९वे:
विषय : मनुस्मृति
सादरकर्ते : विनोद देशपांडे
सणांचा व उत्सवांचा देश अशीही एक ओळख असलेल्या आपल्या भारतात, ह्या सण उत्सवाला लगटूनच येणारा मुद्दा असतो पूर्वापार चाललेल्या परंपरा, चालीरीती, प्रथा, रिवाज..आदि इत्यादींचा ! .. आणि त्याहूनही कळीचा मुद्दा म्हणजे त्यांच्या ग्राह्यतेचा सत्यापनाचा. अलीकडे अश्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी गुगल हे उत्तर असते. त्याच्या सत्यापनात नको जायला. पण त्याआधी ह्या प्रश्नांची संशोधन वजा उकल प्रक्रिया 'शास्त्र असे सांगते', 'पंचांग', ज्योतिषी, 'विवेकसिंधू', 'धर्मसिंधू' अश्या वेगवेगळ्या ज्ञानगंगांतून जात असे. आणि ह्यातील बहुतेकांची गंगोत्री असणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृति.जीवशास्त्र व मानववंशशास्त्र दृष्ट्या जरी मानवाची उत्क्रांती माकडापासून झालेली असली तरी मनुज/मनुष्य ह्या संज्ञांची व्युत्पत्ती आपल्याला पुन्हा मनुपर्यंत नेते. मनुपासून ज्यांची उत्पत्ती ते मनुज.हिंदुंच्या कुठल्याही धार्मिक कर्मकांडाच्या संकल्पात म्हटल्या जाणाऱ्या श्रुतीस्मृतीपुराणोक्त मधील स्मृती म्हणजे अनेक ऋषिमुनींनी त्यांच्या स्मरणानुसार सांगितलेले, लिखित अथवा पठित अथवा संथा देऊन घोटवलेले विविध मंत्र अथवा स्तोत्र अथवा सूक्त. ह्या श्रुतीस्मृतीपुराणोक्त मधील स्मृती जरी एकट्या मनुची नसली तरी त्या असंख्य स्मृतींपैकी एक मनुने सांगितलेली मनुस्मृती तर खचितच असते.एवंच, मनुस्मृतिवाचून (शिवाय) कार्य सिध्दीस जात नाही. म्हणून ती वाचूनच (वाचन करून) शहाण्या पुरुषाने पुढे जावे. शहाणा पुरुष म्हणजे जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाचे महत्त्व जाणतो. चतुर्विध पुरुषार्थ, चातुर्वर्ण्य व्यवस्था, चार आश्रम ह्या साऱ्यांची रीतसर व यथायोग्य मांडणी व या प्रत्येक व्यवस्थेतील तसेच अवस्थेतील व्यक्तीचे कर्तव्य आजच्या भाषेत सांगायचे तर Do's and don'ts ह्याचे मनुस्मृतित साद्यंत विवेचन आहे. समाजकारण, राज्यकारण, धर्मकारण, नीतिशास्त्र अश्या चहू अंगांनी मानवी जीवनाला किंवा मनुष्य जीवनाला स्पर्शणारी मनुस्मृति. ज्यावर नेहमीच मतमतांतरे होत राहिली. राहतात व राहतीलही. राजस्थानच्या न्यायपालिकेच्या आवारातील मनुचा पुतळा वादग्रस्त ठरू लागल्यावर तो तसाच ठेवण्याचा निर्णय झाला. याबाबत विभूतीभूषण शर्मा ह्या एका काँग्रेस नेत्याची टिपण्णी फारच उद्बोधक होती. "उच्च न्यायालयात मनूचा पुतळा बसवण्यात आला तेव्हा तो कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नव्हता. मनू हा लेखी कायदा आणणारा पहिला माणूस मानला जातो. त्या कायद्यात काही तोटा असेल तर तो आपल्या संविधानात केल्याप्रमाणे दुरुस्त्या करण्यास खुला आहे. पुतळ्याचा कोणत्याही जातीशी संबंध नसावा." अश्या मनुविषयी त्याच्या मनुस्मृति विषयी जाणून घ्यायला -ऐकायला उद्या गुरुवार दि. ७ डिसेंबरला शब्दांगणच्या सत्राला जरूर या. हे सत्र सादर करताहेत आपल्या सर्वांना बहुश्रुत व योग्यभाषी म्हणून चिरपरिचित असणारे ध्रुवचेच विनोद देशपांडे !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment