०१।०६।२०२३
सत्र २२५वे:
विषय : अरण्यवाचन
सादरकर्ते : जतिन जोशी
द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सवी सत्र
मंडळी, शब्दांगणच्या मागच्या सत्रात निनाद भागवत यांनी आपल्याला भूशास्त्राचं बोट धरून पृथ्वीच्या अंतरंगाची आणि त्यामुळे पृष्ठभागावर होणार्या घडामोडींची रंजक आणि अद्भुत सफर घडवून आणली. शब्दांगणचं यावेळचं सत्र हे आपल्याला पृथ्वीवरील जंगलाच्या अद्भुत दुनियेची सैर घडवून आणणार आहे. सदाहरित, पानझडी जंगलं, खारफुटीची वनं असे अरण्यांचे प्रकार आपण शाळेत असताना अभ्यासलेले आहेत. पण या पुस्तकी संकल्पनांच्या पलीकडे जाऊन अरण्य म्हणजे काय? ते नक्की कसं बघावं, अरण्यवाचन म्हणजे नेमकं काय? अशा जंगलाच्या अपरिचित पैलूंचा परिचय या सत्रात आपल्याला होईल. आणि या विषयाचा परिचय करून देणार आहे आपल्या डोंबिवलीतीलच शालेय वयापासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करत असलेला युवा पर्यावरण आणि अरण्यप्रेमी जतिन जोशी. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भविष्यातील वाढत चाललेली निसर्ग -मानव साहचर्याची निकड, Human- Wildlife Conflictच्या वाढत्या घटना, जंगलांवरील मानवी अतिक्रमण या पार्श्वभूमीवर जतिनचं हे सत्र निश्चितच जंगलांविषयी वेगळा दृष्टिकोन निर्माण करणारं ठरेल ज्यामधून आपल्या सर्वांनाच जंगलांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. त्यामुळे अरण्यवाचन या आगळ्यावेगळ्या विषयावरच्या रंजक सत्राला आवर्जून उपस्थित राहा.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment