१२।१०।२०२३
सत्र २४२वे:
विषय : सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा
सादरकर्ते : क्षितिज देसाई
जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर किंवा प्रसंगी फिलिप के डिक, आयझॅक असिमोव यांसारख्या महान वैज्ञानिक/विज्ञान कथाकारांनी आपलं बालपणीचं वाचनविश्व समृद्ध केलेलं असतं. त्या विज्ञानकथा वाचत असताना आपणही असं काहीतरी लिहावं असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात निदान एकदा तरी नक्की डोकावून गेलेला असतो. विज्ञानकथांच्या विश्वात हरवून गेलेलो असताना आपल्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे आपल्या सर्वांना आठवत असतीलच. काही व्यक्तींनी मात्र स्वतःला मनातल्या मनात कल्पना रचण्यापुरतंच मर्यादित न ठेवता, त्या फुटलेल्या धुमाऱ्यांवर प्रत्यक्ष काम केलं. असाच एक युवा, सशक्त विज्ञानकथाकार, आपला डोंबिवलीकर असलेला क्षितिज देसाई या वेळच्या शब्दांगणच्या सत्रामधून आपल्या भेटीला येतोय. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा त्याचा विज्ञानकथा संग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. हा कथासंग्रह, एकूणच विज्ञानकथा, त्या कशा सुचतात, कशा लिहाव्यात, त्याचा स्वतःचा लेखनप्रवास आणि लेखनानुभव अशा विविध गोष्टींवर क्षितिज श्रोत्यांशी गप्पा मारणार आहे. आपण सर्वांनीच आणि विशेषतः विज्ञानकथाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावं असं हे सत्र ! नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment