Thursday, November 9, 2023

सत्र २४४ : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख) : मुकुल आव्हाड

२६।१०।२०२३

सत्र २४४वे:

विषय : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख )

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



हिंदू-मुस्लिम संबंध, इस्लाम, सावरकर, भारताची फाळणी, गांधीहत्या, १८५७ चा जिहाद/स्वातंत्र्यसमर अशा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयांवर बुद्धिवादी, प्रगल्भ आणि तितकंच वादळी लेखन करणारं व्यासंगी, तत्त्वज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे डॉ शेषराव मोरे. महाविद्यालयात प्राध्यापकी करत असताना अभ्यास आणि वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने चाळीशीतच निवृत्ती स्वीकारून रोज १७-१८ तास वाचन सुरू झालं आणि त्या वाचन, चिंतनातून अक्षरशः एकेका रत्नासमान ग्रंथ जन्माला आले."सावरकर व कुरुंदकर यांच्याकडून आम्ही बुद्धीवाद शिकलो... शब्दप्रामाण्य नव्हे!" हे शेषरावांचं वाक्य त्यांच्यातल्या बुद्धीवाद्याचं निदर्शक आहे.एवढं विविधांगी लेखन करताना संदर्भ आणि पुराव्यांची छाननी करून सत्य आणि वस्तुस्थिती ठामपणे मांडणं हे शेषरावांचं ब्रीद होतं. अर्थात हे करत असताना अनेक लोकांना अप्रिय वाटेल असं किंवा ते दुखावले जातील असं लेखन होणं हे स्वाभाविकच होतं. शेषरावांनी अनेक नियतकालिकं, मासिकांमध्ये लिहिलेल्या अशाच काही अप्रिय वाटणाऱ्या परंतु परखड मतं मांडणाऱ्या लेखांचे संग्रह म्हणजे 'अप्रिय पण' आणि 'विचारकलह' आणि हाच विषय आहे आपल्या येत्या गुरुवारच्या शब्दांगणच्या सत्राचा. शेषरावांच्या विचारांवर सत्र घेणं हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा कमी नाही हे ज्यांनी शेषराव वाचलेत ते नक्कीच मान्य करतील. हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याच शब्दांगण मधील अतिशय अभ्यासू आणि उत्तम वाचक असलेला मुकुल आव्हाड. ज्यांनी शेषराव वाचले आहेत त्यांनी पुनर्नुभूती चा प्रत्यय घेण्यासाठी, ज्यांनी वाचले नाहीयेत त्यांनी का वाचायला हवेत हे समजून घेण्यासाठी आणि ज्यांना वाचायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर वाचायला सुरुवात करावी यासाठी या सत्राला उपस्थित राहणं अनिवार्य आहे!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...